मनपा विरोधी पक्षनेते सुनिल महाजन यांचे पत्रकार परिषदेत आरोप ; सत्ताधारी विकासकामांमध्ये टक्केवारी घेण्यात व्यस्त; आमदार भोळेंचे प्रशासनावर वचक नाही
जळगाव: महापालिकेने विविध विकासयोजनांसाठी हुडको या संस्थेकडून घेतलेले 141 कोटी रुपयांचे कर्ज आणि त्यावरील व्याजापोटी 341 कोटी रुपयांची रक्कम न भरल्याने हुडकोने काल बुधवारी, जळगाव महापालिकेची बँक खाती सील केले आहे. याबाबत पत्र संबंधित बँका व महापालिका प्रशासनाला पाठविले आहे. दरम्यान मनपा विरोधी पक्षनेते सुनिल महाजन यांनी यावरून पत्रकार परिषद घेत सत्ताधाऱ्यांवर आरोप केले आहे. हुडकोच्या कर्ज थकविल्याप्रकरणी मनपावर खाते सील होण्याची जी नामुष्की ओढविली आहे, त्यासाठी पूर्णत: मनपातील सत्ताधारी जबाबदार असल्याचे आरोप त्यांनी केले. विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली, यावेळी शिवसेना गटनेते बंटी उर्फ अनंत जोशी, नगरसेवक शरद तायडे, प्रशांत नाईक, गणेश सोनवणे आदी उपस्थित होते.
सत्ताधाऱ्यांकडून झोपेचे सोंग
मनपात सत्ताधाऱ्यांचा भोंगळ कारभार सुरु आहे, सत्ताधारी गटाचे स्थानिक नेतृत्त्व फक्त विकासकामांमध्ये टक्केवारी कशी मिळेल यासाठी प्रयत्नरत आहे. सत्ताधारी टक्केवारीत गुंतलेले असल्याने हुडको आणि गाळ्यांच्या प्रश्नाकडे सपशेल दुर्लक्ष झाले. माध्यमांनी वारंवार सत्ताधाऱ्यांना जागृत करण्याचे प्रयत्न केले, मात्र झोपेचे सोंग घेतलेले सत्ताधारी जागृत झाले नाही. त्यामुळेच आज मनपाच्या खाती सील होण्याची नामुष्की ओढविली आहे असे आरोप यावेळी विरोधी पक्षनेते सुनिल महाजन यांनी केले.
जे पेरले ते उगविले
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तत्कालीन नगरसेवक आमदार सुरेश भोळे यांनी भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याला आणि तत्कालीन आयुक्त संजय कापडणीस यांना हाताशी धरून मनपाचे खाते सील करण्यासाठी प्रयत्न करून खाते सील करण्यात यश मिळविले होते. आता पुन्हा २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मनपात भाजपची सत्ता असतांना खाते सील झाले आहे. आमदार सुरेश भोळे यांनी जे पेरले तेच उगविले आहे असे आरोप यावेळी करण्यात आले.
भोळेंवर गुन्हा दाखल व्हावा
मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे जळगाव शहरात आले होते, त्यावेळी त्यांनी २५ कोटींचा निधी शहराच्या विकासासाठी दिले होते. मात्र २५ कोटी पैकी एक रुपया देखील आमदार भोळे यांनी खर्च केला नाही. आमदार भोळे यांनी शहरवासियांना वचननाम्याद्वारे मोठ-मोठे आश्वासन दिले होते. मात्र एकही आश्वासन त्यांनी पूर्ण केले नाही. गाळे धारकांची फसवणूक आमदार भोळे यांनी केली असून जनतेने त्यांच्यावर १९९ अंतर्गत गुन्हा दाखल करावे असे आवाहन सुनिल महाजन यांनी केले.
ना.महाजन मत मागणार का?
महानगरपालिका निवडणुकीदरम्यान जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी एका वर्षात जळगावचा विकास करेल असे आश्वासन देत, विकास न झाल्यास आमदार भोळेंसाठी पुन्हा मत मागायला येणार नाही असे सांगितले होते. मात्र शहरात भाजपची सत्ता येऊन वर्ष पूर्ण होत आला, मात्र अद्यापही विकासकामे झालेले नाही, त्यामुळे पुढील विधानसभा निवडणुकीत जलसंपदामंत्री गिरीश महाजन आमदार भोळे यांच्यासाठी मत मागणार का? असा प्रश्न शिवसेना मनपा गटनेते बंटी जोशी यांनी उपस्थित केले.