* नेरी नाका स्मशानभूमीत केले अंत्यसंस्कार
* नातेवाईकांनी जिल्हा रूग्णालयात फोडला हंबरडा
जळगाव । महापालिकेच्या बडतर्फ कर्मचार्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी रात्री 11 वाजेदरम्यान कांचननगरात घडली. वाल्मीक सुपडू सपकाळे (वय 42) हे महापालिकेत शिपाई पदावर कार्यरत होते. त्यांना 4 महिन्यापूर्वी बडतर्फ करण्यात आले होते. त्यांनी शुक्रवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास ते घराच्या वरच्या मजल्यावर गेल्यावर बराचवेळ बाहेर आले नाही. त्यामुळे त्यांच्या पुतण्यांनी जाऊन पाहिले असता सपकाळे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. त्यांना जिल्हा रुग्णालयात आणले. तपासणीअंती त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन भाऊ, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.
जिल्हा रूग्णालयात गर्दी
जिल्हा रुग्णालय परिसरात सपकाळे यांचे नातेवाईक व मित्र परिवाराने गर्दी केली होती. या वेळी अनेकांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करत हंबरडा फोडला. यावेळी जिल्हा रुग्णालयात जवळपास चारशे ते पाचशे नागरिक उपस्थित होते. दरम्यान यावेळी आमदार सुरेश भोळे यांनी भेट दिली. आज सकाळी शवविच्छेदन करून नेरी नाका येथे अंतिसस्कार करण्यात आले.