मनपाच्या भरोश्यावर न राहता नागरिकांनी स्वत:च तयार केला रस्ता

0

जळगाव: जळगावातील रस्त्यांमुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेक वर्षांपासूनची समस्या सुटलेली नाही. कोट्यावधींचा निधी खर्च झालेला आहे, मात्र रस्ते आहेत तशीच आहेत. आता नागरिकांनी मनपा आणि सरकारच्या भरोसे न राहता स्वत:च स्वखर्चाने रस्ता तयार करण्याला सुरुवात केली आहे. खोटेनगर ते चंदू अण्णानगर दरम्यान असलेल्या रस्ता मनपाने तयार केला नाही. त्यामुळे नागरिकांनी स्वत:च पुढाकार घेत अगोदरच्या बांधकामातून उरलेले टाकाऊ साहित्याच्या माध्यमातून रस्ता तयार केला आहे. त्यासाठी लागणारे अवजार जसे जेसीबी, मजूर देखील स्वखर्चानेच आणले. विलास महाजन आणि प्रकाश पाटील यांनी यासाठी विशेष पुढाकार घेतला. त्यांनी जेसीबी मागवून टाकाऊ मटेरियल पसरविले आणि रस्ता वाढविला. ४० फुटांपर्यंत रस्ता रुंद झाला आहे. विलास महाजन आणि प्रकाश पाटील हे गेल्या २० वर्षांपासून या भागात राहतात, प्रत्येक पावसाळ्यात त्यांनी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी पुढाकार घेतला आहे.

खोटेनगर खदानी जवळच्या रस्त्यांची दुरुस्ती करून रुंदी वाढवली आहे. रुंदी कमी असल्याने नागरिकांना होणारा त्रास आणि किरकोळ अपघात आता कमी होणार आहे. या भागातील नागरिकांनी सातत्याने रस्ता दुरुस्तीची मागणी मनपाकडे केली होती, मात्र मनपाने त्याकडे दुर्लक्ष केले, शेवटी वैतागलेल्या नागरिकांनी स्वत:च रस्ते दुरुस्तीसाठी पुढाकार घेतला.