मनपाच्या स्थायी सभेत अधिकार्‍यांची झाडाझडती

0

जळगाव । महापालिकेच्या स्थायी सभेत अधिकारी काम करीत नसल्याने नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. याप्रसंगी सभापती ज्योती इंगळे, उपायुक्त चंद्रकांत खोसे, सहाय्यक आयुक्त लक्ष्मीकांत कहार, नगरसचिव अनिल वानखेडे उपस्थित होते. यावेळी विषयपत्रिकेवरील 13 पैकी 11 विषय मंजूर करण्यात आले. तर एक विषय भाजपा नगरसेवकांनी विरोध केल्याने बहुमताने मंजूर करण्यात आला. तर एक विषय तहकूब ठेवण्यात आला.

वैद्यकीय अधिकार्‍यांवर गैरसमजातून आरोप
वैद्यकीय अधिकारी विजय पंडीत घोलप यांनी परिचारीकेशी गैरवर्तणूक केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. यानुसार चौकशी होऊन दोन वार्षिक वेतनवाढ कायमस्वरूपी बंद करणे, माफीनामा लिहून घेण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. याबात नितीन बरडे यांनी आरोग्य अधिकारी रामरावलानी यांना विचारणा केली. रामरावलानी यांनी तत्कालीन आयुक्त जीवन सोनवणे यांनी महिला लैंगीक छळ समितीद्वारा चौकशी केल्यानंतर यात डॉ. घोलप दोषी आढळून आले होते असे नमुद केले. उपायुक्त खोसे यांनी घोलप याची दोन वार्षिक वेतनवाढ कायमस्वरूपी बंद करणे, माफीनामा लिहून घेण्यात आल्याची माहिती दिली. तर सभापती ज्योती इंगळे यांनी हा प्रकार गैरसमजातून झाला असल्याचे स्पष्ट केले. तर नितीन बरडे यांनी हा प्रकार हॉस्पीटलमधील वादातून घडला असल्याचे निदर्शनास आणून दिले. सभापती ज्योती इंगळे यांनी हा विषय तहकूब ठेवला.