मुंबई । मुंबई महापालिकेच्या 17 प्रभाग समित्यांपैकी 16 प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यामध्ये ए, बी व ई या प्रभाग समितीच्याच अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. उर्वरीत 15 प्रभाग समिती अध्यक्षपदांसाठी शिवसेना आणि भाजपाच्या नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली आहे. यामध्ये भाजपाचे 8 आणि शिवसेनेचे 7 नगरसेवक आहेत. शिक्षण, स्थायी, सुधार आणि बेस्ट समिती अध्यक्षपदाच्या निवडणुका झाल्यानंतर 17 प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुका येत्या 12 आणि 13 एप्रिल रोजी होणार आहेत. यातील 16 प्रभाग समिती अध्यक्षपदांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यात आले आहे.
प्रतिस्पर्धी उमेदवारांनी अर्ज भरलेच नाहीत
आजवरच्या इतिहासात प्रथमच 17 पैकी 15 प्रभाग समिती अध्यक्षपदी बिनविरोध निवड होत आहे. प्रतिस्पर्धी उमेदवारांनी अर्जच न भरल्याने 15 प्रभागांमध्ये अध्यक्षपदाच्या उमेदवारांची निवड बिनविरोध होत आहे. केवळ ए, बी आणि ई प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी भाजपाकडून अभासेच्या गीता गवळी आणि काँग्रेसच्या आफ्रीन शेख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे या ठिकाणी येत्या 12 एप्रिल रोजी निवडणूक होणार आहे.
गीता गवळी, दाभाडकरांंना पुन्हा संधी
प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी अभासेच्या गीता गवळी आणि योगीराज दाभाडकर यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. ए, बी व ई प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी गीता गवळी आणि के-पश्चिम प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी योगीराज दाभाडकर यांचा उमेदवारी देण्यात आली आहे. यामध्ये दाभाडकर यांच्या समोर प्रतिस्पर्धी उमेदवाराने अर्ज न भरल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर गीता गवळी यांच्या प्रभागात काँग्रेसने उमेदवारी अर्ज भरल्याने निवडणूक होणार आहे. मात्र भाजपने या दोन्ही अध्यक्षांना पुन्हा संधी दिली असली तरी शिवसेनेने कोणाही अध्यक्षाला पुन्हा संधी दिलेली नाही.
निवडून आलेले प्रभाग समिती अध्यक्ष
ए,बी,ई प्रभाग समिती ः गीता गवळी, अभासे (भाजपा पुरस्कृत),
सी व डी प्रभाग समिती ः अतुल शाह, भाजपा (बिनविरोध)
एफ- द. व उ. प्रभाग समिती ः सचिन, शिवसेना (बिनविरोध)
जी-दक्षिण प्रभाग समिती ः किशोरी पेडणेकर, शिवसेना (बिनविरोध)
जी-उत्तर प्रभाग समिती ः मरिअम्माल मुत्तू तेवर, शिवसेना (बिनविरोध)
एच-पूर्व व पश्चिम प्रभाग समिती ः सदा परब, शिवसेना (बिनविरोध)
के-पूर्व प्रभाग समिती ः सुनील यादव, भाजपा (बिनविरोध)
के-पश्चिम प्रभाग समिती ः योगीराज दाभाडकर, भाजप (बिनविरोध)
पी-दक्षिण प्रभाग समिती ः संदीप पटेल, भाजपा (बिनविरोध)
पी-उत्तर प्रभाग समिती ः जया तिवाना, भाजपा (बिनविरोध)
आर-दक्षिण प्रभाग समिती ः शिवकुमार झा, भाजपा (बिनविरोध)
आर-मध्य व उत्तर प्रभाग समिती ः रिद्धी खुरसुंगे, शिवसेना (बिनविरोध)
म-पश्चिम प्रभाग समिती ः राजेश फुलवारिया, भाजपा (बिनविरोध)
एस व टी प्रभाग समिती ः सारिका मंगेश पवार, भाजपा (बिनविरोध)
एल प्रभाग समिती ः किरण लांडगे, शिवसेना पुरस्कृत अपक्ष (बिनविरोध)
एन प्रभाग समिती अध्यक्ष ः रुपाली आवळे, शिवसेना (बिनविरोध)