मनपा कंत्राटी कामगारांना वेतन फरक ही मिळणार

0

नवी मुंबई । मनसे कामगार युनियनने नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत येणार्‍या 17 विभागांतील कंत्राटी कामगारांच्या 29 महिन्यांच्या वेतन फरकाबाबत 2018 च्या आर्थिक बजेटमध्ये तरतूद करावी, असे लेखी निवेदन शुक्रवार 23 फेब्रुवारी रोजी आयुक्तांना दिले होते. तसे न झाल्यास आम्ही 28 फेब्रुवारी रोजी मनपामध्ये भजन आंदोलन करू, असा इशाराही मनसेने दिला होता. त्याबाबत आज तत्काळ सोमवार 26 फेब्रुवारी रोजी अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांनी मनसे कामगार युनियनच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावले. मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे व मनसे कामगार युनियनचे अध्यक्ष आप्पासाहेब कोठुळे यांनी मनपा कंत्राटी कामगारांच्या 29 महिन्यांच्या वेतन फरकाची चालू आर्थिक वर्षात बजेटमध्ये तरतूद का केली नाही, असा सवाल करत व इतर विविध मागण्या सोडवण्याबाबत आग्रही भूमिका घेतली. यावर अतिरिक्त आयुक्तांनी मनसे शिष्टमंडळास सांगितले की मनपा आयुक्त चर्चा केल्यानंतर आयुक्तांनी असे सुचवले की याबाबत बजेटमध्ये तरतूद करण्याची आवश्यकता नसून महासभेत व स्थायी समितीमध्ये ठराव पास करून टप्प्याटप्प्याने 29 महिन्यांचा वेतन फरक देण्यात येईल.

युनियनच्या पाठपुराव्यामुळे कंत्राटी कामगारांना वेतनातील फरक
तसेच घंटागाडीच्या कामगारांचा वेतनातील 6 महिन्यांचा फरक लवकरात लवकर देऊ, असे आश्‍वासनदेखील अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांनी मनसेच्या शिष्टमंडळास दिले सातत्याने मनसे कामगार युनियनच्या पाठपुराव्यामुळे कंत्राटी कामगारांना वेतनातील फरक, पगाराची पावती, ओळखपत्र, गणवेश इत्यादी समस्यांचे निवारण त्वरित होत असल्यामुळे कामगारांमध्ये समाधानाचे वातावरण असल्याचे युनियनचे कार्याध्यक्ष अमोल आयवळे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. यावेळी मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे, कामगार सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष राजेश उज्जैनकर, कामगार युनियनचे शहर अध्यक्ष आप्पासाहेब कोठुळे, कार्याध्यक्ष अमोल आयवळे, सरचिटणीस अभिजित देसाई, उपाध्यक्ष रुपेश कदम, गजानन ठेंग, संजय सुतार व मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते.