मनपा निवडणूकीत इव्हीएममध्ये घोटाळा

0

मदन शेळके यांचा आरोप
प्रभाग 8 अ व 18 ड मध्ये भविष्यात वाद होण्याची व्यक्त केली शक्यता
घोटाळा कसा झाला याची माहिती देण्यात ठरले अपयशी

जळगाव । शहरात नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणूकीत इव्हीएम घोटाळा झाला असल्याचा आरोप अमरावतीचे मदन शेळके यांनी केला. ते पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. याप्रसंगी काँग्रसचे उमेदवार शिवराम पाटील, काँग्रेसचे जेष्ठ नेेते व आरटीआय कार्यकर्ते उल्हास साबळे, अमोल कोल्हे आदी उपस्थित होते.

उमेदवारांनी मतपत्रिकेची मागणी करावी असे त्यांनी पुढे सांगितले. शेळके यांना जळगाव महापालिका निवडणूकीत इव्हीएम घोटाळा झाला आहे याची माहिती कशी मिळाली अशी विचारणा केली असता त्यांनी हा घोटाळा झाला आहे हे कानोकानी आले असल्याचे स्पष्ट केले. यावेळी निवडून आलेल्या उमेदवारांची यादी होती व ती कशी खरी आहे, हे आपण न्यायालयात सिद्ध करू शकतो असा दावा शेळके यांनी केला. माझे चुकत असेल तर पोलिस माझ्यांवर कारवाई करतील असा ठाम विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. शहरात प्रभाग निहाय पद्धती आहे, परंतु, वार्ड निहाय उमेदवार निवडून आले नसल्याचा आरोप शेळके यांनी केला. प्रभाग क्र. 8 अ व 18 डमध्ये भविष्यात काहीतरी वाद होण्याची शक्यता असल्याचे भाष्य शेळके यांनी केले.

मतदान चालु असतांना मतदान कर्मचारी फोनवरून किती टक्के मतदान झाले याची माहिती देत असतात. कारण त्यांना मतदानाची टक्केवारी ही एकसारखी करावयाची असते असा आरोप शेळके यांनी केला. यामुळे मतदान कर्मचार्‍यांच्या फोनवर बंदी आणावी अशी मागणी त्यांनी केली. मतदान यंत्रांवर आडनावाच्या अक्षरांनुसार उमेदवारांची नावे देणे बंधनकारक असतांना तसे केले जात नसल्याचा आरोप करण्यात आला.

मदन शेळके हे महापालिका निवडणूकीतील मतदान प्रक्रीयेतील झालेला घोटाळा पुराव्यानिशी मांडणार असल्याचे जाहिर केलेले असल्याने राजकीय पक्षाचे कार्यकर्ते पराभूत उमेदवार, भाजपचे कार्यकर्ते हे देखील सभागृहात हजर होते. मात्र, शेळके हे केवळ तांत्रिक बाबींवर बोलत असल्याने इव्हीएम मशिनमध्ये कशा प्रकारे फेरफार झाला आहे हे स्पष्ट करत नसल्याने त्यांच्यात गोंधळाचे वातारण तयार झाले. यावेळी भाजपचे कैलास सोनवणे देखील हजर होते. त्यांनी प्रश्‍न उपस्थित करण्याचा प्रयत्न केला असता आयोजकांनी त्यांना बोलू दिले नाही व केवळ पत्रकारांनी बोलावे अशी सूचना केली.

शेळके हे कोणत्या प्रभागात इव्हीएम घोटाळा झाला आहे याची माहिती पुराव्यानिशी देत नसल्याने सभागृहात गोंधळाला सुरूवात झाली. यावेळी शिवराम पाटील यांनी मतदानाच्या आदल्या रात्री प्रभाग क्र. 16 मधील मतदान कर्मचार्‍यांना महापालिका प्रशासकीय इमारतीच्या पाचव्या मजल्यावर डांबून ठेवण्यात आले होते, असा आरापे केला.त्यांनी तक्रार केल्यांवर या सर्व 32 कर्मचार्‍यांना रात्री 10 वाजता सोडण्यात आल्याचा दावा शिवराम पाटील यांनी केला.

शेळके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राजकुमार बडोले, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, विद्या ठाकूर, पंकजा मुंडे, दिलीप कांबळे आदी भाजपचे नेते हे 2014 साली इव्हीएम मशिनमध्ये घोटाळा करून विजयी झाले असल्याचा सनसनाटी आरोप केला. या आरोपाला काही आधार आहे का? याची विचारणा पत्रकारांकडून करण्यात आली असता शेळके यांनी मी येथे पुरावा देण्यासाठी नाही तर माहिती सांगण्यासाठी आलो असल्याचे म्हणत पत्रकार परिषद आटोपती घेतली.