मनपा विधी समिती सभापतीपदी रमेश जैन

0

जळगाव। महानगरपालिकेच्या विधी समिती सभापतीपदी खान्देश विकास आघाडीचे नेते रमेश जैन यांची निवड गुरूवार 27 एप्रिल रोजी करण्यात आली. गुरूवारी सकाळी 11 वाजता महापालिकेच्या प्रशासकिय इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावरील सभागृहात सभापती निवडीसाठी आयोजित विशेष बैठकीत ही निवड घोषित करण्यात आली. महापौर नितीन लढ्ढा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली.

पाच सदस्यीय विधी समिती
मनपाच्या विविध विभागांतील अनेक प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत़ जिल्हा न्यायालयसह उच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यांच्या कामकाजावर नियंत्रण व देखरेख ठेवण्यासाठी पाच सदस्यीय विधी समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीत खाविआ नेते रमेश जैन, महापौर नितीन लढ्ढा, माजी उपमहापौर सुनिल महाजन, मनसेचे अनंत जोशी व राष्ट्रवादीचे गटनेते सुरेश सोनवणे यांची निवड करण्यात आली असून गुरूवारी समितीच्या सभापतीपदी खाविआ नेते रमेश जैन यांची निवड घोषित करण्यात आली. मनसेचे अनंत जोशी हे सुचक तर राष्ट्रवादीचे गटनेते सुरेश सोनवणे हे अनुमोदक होते. दरम्यान, याआधीच सभापतीपदी रमेश जैन यांचे नाव निश्चित झाले होते. गुरूवारी औपचारिकरित्या घोषणा करण्यात येवून निवड करण्यात आली. या बैठकीस महापौर नितीन लढ्ढा, माजी उपमहापौर सुनिल महाजन, मनसेचे अनंत जोशी व राष्ट्रवादीचे गटनेते सुरेश सोनवणे यांच्यासह विधी शाखा प्रमुख सुभाष मराठे, नगर सचिव निरंजन सैंदाणे आदी उपस्थित होते़ यावेळी महापौर नितीन लढ्ढा यांनी नवनिर्वाचित विधी समिती सभापती रमेश जैन यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.