मनपा शाळेत सुरक्षारक्षक नेमण्याची रमाई फाउंडेशचीमागणी

0

जळगाव। मेहरुण परिसरातील रामनगरातील आठवर्षीय मुलीवर अल्पवयीन मुलाने रामेश्‍वर कॉलनीतील मनपाच्या शाळेच्या शौचालयात नेऊन अत्याचार केल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली होती. गजबजलेल्या वस्तीमध्ये असलेल्या शाळेत सुरक्षा रक्षक नसल्याने ही घटना घडली असून पुन्हा अशी घटना होवू नये यासाठी या शाळेत सुरक्षा रक्षक नेमावे अशी मागणी परिसरातील नागरिकांनी तसेच आई जिजाऊ माता, रमाई फाउंडेशन पत्राद्वारे केली आहे.

मेहरुण परिसरातील रामेश्‍वर नगरातील शाळा क्रमांक 50 मधील शौचालयात आठवर्षीय मुलीवर अल्पवयीन मुलाने अत्याचार शुक्रवारी केल्याची घटना घडली. ही शाळा गजबजलेल्या वस्तीमधे असून देखील ही घटना केवळ शाळेत सुरक्षा रक्षक नसल्याने घडली असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. पुन्हा प्रकारच्या अशा घटनेची पुनरावृत्ती होवू नये यासाठी जिल्हाधिकारी तथा मनपाचे प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांनी जातीने लक्ष घालून शाळा क्रमांक 50 सह इतर मनपाच्या शाळांमध्ये सुरक्षा रक्षकांची तत्काळ नेमणूक करावी. अन्यथा मेहरुण, रामेश्‍वर, रामनगरातील रहिवासी आई जिजाऊ माता, रमाई फाउंडेशनच्या माध्यमातून आंदोलन करतील.