मनमानी कर आकारणीला भोरवासियांचा विरोध

0

घरमालक संघाकडे तक्रार; मुख्याधिकार्‍यांना निवेदन

भोर : नगरपालिका प्रशासनाने कर आकारणीमध्ये मनमानी कारभार केला असून झोन बदलात कर आकारणीत चार ते पाच पटीने वाढ केली आहे. अनेक मालमत्ताधारक स्वतः राहत असतानाही त्या ठिकाणी भाडेकरू राहत असल्याचे दाखवून भाड्यावर कर आकारणी केली आहे. तर निवासी वापर असताना व्यावसायीक वापर दाखवून मालमत्ताधारकांना कर जमा करण्याच्या नोटिसा बजावल्या असल्याने शहरातील मालमत्ताधारकांत घबराट पसरली आहे. अनेक मालकांनी घरमालक संघाकडे तक्रारी केल्या आहेत. संघाने या विषयाचे निवेदन मुख्याधिकार्‍यांना दिले आहे, अशी माहिती संघाचे अध्यक्ष उस्मान शेख यांनी दिली.

करात पाचपट वाढ

नगरपालिका प्रशासनाने कर आकारणीच्या नोटिसा पाठविल्या होत्या. तसेच यावर हरकती नोंदविण्यास सांगितले होते. वास्तविक पाहता नोटीस काढल्यापासून 1 महिन्याच्या आत हरकती स्वीकारणे बंधनकारक असताना प्रशासनाने याचे पालन केले नाही. याचबरोबर 2018-19च्या चतुर्थ कर आकारणीमध्ये झोन बदल केल्याने कर आकारणीत चार ते पाचपट वाढ झाली आहे. नियमाप्रमाणे पूर्वीच्या कर आकारणीच्या दिड पटी पेक्षा जास्त कर आकारता येत नाही. याला घर मालक संघाने विरोध केला आहे, असे शेख यांनी सांगितले.

न्यायालयात जाण्याचा इशारा

माहितीच्या अधिकारात नगरपालिका प्रशासनाकडे पालिकेने झोन बदल केलेत का? त्यासाठी कौन्सिल आणि शासनाची मान्यता घेतली आहे का? झोन बदल केले असल्यास त्यासाठी कोणते निकष लावलेत? करदात्यांना एक महिना आगोदर नोटीस दिली का? याची माहिती मागितली आहे, अन्यथा न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचा इशारा शेख यांनी दिला आहे. या निवेदनावर शेख समवेत उपाध्यक्ष अनिल बागडे व सचिव सुरेश महाडीक यांच्या सह्या आहेत.