मनमानी कारभाराचे दणके

0

सत्तेवर आल्यावर आपण म्हणू तो कायदा, अशी बर्‍याच राज्यकर्त्यांची धारणा असते. लोकशाही व्यवस्थेत अशी हडेलहप्पी चालवून घेतली जात नसते. विशेषतः अमेरिकेसारख्या देशात तर नाहीच. परंतु, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना असले काही मंजूर नाही. त्यामुळेच ते मनमानी कारभार करून अमेरिकी धोरणकर्ते व आपल्याच रिपब्लिकन पक्षाची अडचण करत आहेत. आपले वर्तन अध्यक्षपदावरील व्यक्तीस शोभणारे नसल्याची टोचणीही त्यांना नाही. आता एका नव्या वादाला त्यांनी तोंड फोडले असून, त्यात त्यांचे पदही जाण्याचा धोका संभवतो आहे.

सीरियात आयसिसविरोधात अमेरिका आणि रशियाने आघाडी उघडली आहे. सीरियाचे अध्यक्ष बशर अल असाद यांच्या बाजूने रशिया व इराण उभा आहे, तर अमेरिका या दोघांच्या विरोधात. एकूणच सीरिया व इराकमधील अमेरिकेच्या कारवायांसाठी गुप्तचर विभाग आत्यंतिक महत्त्वाची भूमिका बजावतो आहे. याच गुप्तचर विभागाला मदत करणार्‍या काही घटकांनी अमेरिकेला दिलेली अत्यंत संवेदनशील व गोपनीय माहिती ट्रम्प यांनी रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरॉव आणि रशियाचे अमेरिकेतील राजदूत सर्गेई किस्ल्याकी यांना दिल्याचे प्रकरण अमेरिकी माध्यमांनी उघडकीस आणल्याने अमेरिकी राजकारणात जणू भूकंपच झाला आहे. अत्यंत संवेदनशील व गोपनीय माहितीबाबत अमेरिकेत विशेष कायदा आहे. त्यानुसार अशी माहिती कोणालाही कोणत्याही परिस्थितीत जाहीर करता येत नाही किंवा त्याची माहितीही कोणाला देता येत नाही. ट्रम्प यांनी या कायद्याचे उल्लंघन केल्याचा दावा केला जात आहे. त्यापेक्षाही गंभार बाब म्हणजे अमेरिकेला मदत करणार्‍या घटकांची कोणतीही परवानगी न घेताच ट्रम्प महाशयांनी रशियाला ही माहिती दिल्याने अमेरिकी धोरणकर्ते, सत्ताधारी रिपब्लिकन पक्ष आणि अमेरिकी गुप्तचर यंत्रणा हवालदिल झाल्या आहेत. अमेरिकेला मदत करणार्‍या पश्‍चिम आशियातील घटकांवर याचा विपरीत परिणाम होण्याचा धोका या सर्वांना वाटतो आहे. ट्रम्प यांनी आततायीपणा करत अमेरिकेच्या विश्‍वासार्हतेवरच प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे. पण ट्रम्प यांच्या गावी ही गोष्ट नाही, हे अधिक गंभीर आहे.

अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रशियाने सायबर ढवळाढवळ केल्याचे प्रकरण ताजेच आहे. ट्रम्प यांच्या विजयासाठीच रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या आदेशावरून ही ढवळाढवळ केली गेली, असा आरोप आहे. ट्रम्प यांनी सत्तेवर येताच मायकेल फ्लिन या माजी सेनाधिकार्‍यास सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्त केले होते. या फ्लिन महाशयांनी किस्ल्याकी व अन्य रशियन अधिकार्‍यांशी गुप्तपणे चर्चा केल्याचे प्रकरण बाहेर येताच अवघ्या 24 दिवसांत या फ्लिन महाशयांना बडतर्फ करण्याचा निर्णय ट्रम्प यांना घ्यावा लागला होता. या सर्व प्रकरणाची चौकशी फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचे (एफबीआय) संचालक जेम्स कोमी करत होते. याच कोमी यांची ट्रम्प यांनी गेल्या आठवड्यात हकालपट्टी केल्याने अमेरिकी जनमत खवळले आहे. फ्लिन आणि रशियाच्या ढवळाढवळ प्रकरणाची चौैकशी कोमी यांनी गुंडाळावी, यासाठी ट्रम्प यांनी कसा दबाव आणला हेही तेथील माध्यमांनी मंगळवारी उघडकीस आणल्याने तर ट्रम्प यांची अधिकच अडचण झाली आहे. ट्रम्प यांच्यापेक्षाही त्यांच्या प्रशासनातील अधिकारी व धोरणकर्ते अधिकच अडचणीत येत आहेत. कोमी यांच्या हकालपट्टीचे प्रकरण ट्रम्प यांना भोवू शकते, असा इशारा तेथील विधिज्ञ देत आहेत, हे यासंदर्भात अधिक लक्षणीय मानावे लागेल.

ट्रम्प यांच्या तुघलकी कारभारावर अवघ्या काही महिन्यांतच होऊ लागलेली ही टीका अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेला आणि दबावाला मारक ठरणारी आहे. पुतिन यांच्या नेतृत्वाखालील रशियाच्या सत्ताकांक्षा अधिक वाढल्या आहेत. त्यातून पुतिन विस्तारवादी धोरणे राबवू लागले आहेत. त्यातच चीननेही अमेरिकेविरोधात दंड थोपटले असून, रशियाशी सहकार्याची भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अमेरिकेला पश्‍चिम आशियाबरोबरच पुन्हा एकदा अफगाणिस्तान व पाकिस्तानवरील आपला प्रभाव कायम टिकवण्याची गरज निर्माण झाली आहे. प्रशांत महासागरातील देशांबरोबरच पश्‍चिम आशियात राजकीय मोर्चेबांधणी करण्यासाठी अमेरिकी धोरणकर्ते नव्याने प्रयत्नशील आहेत. मात्र, ट्रम्प कोणत्या वेळी कोणती घोषणा करतील, याचा नेमच उरला नसल्याने अमेरिकेचे राष्ट्रीय हित जपायचे कसे, असा या सर्वांपुढील पेच आहे.

परदेशी पाहुण्यांशी देशप्रमुखांनी काय आणि कसे बोलावे, याचे संकेत सर्वच देशांत असतात आणि त्या-त्या देशांचे प्रमुख हे संकेत पाळत असतात. ट्रम्प यांनाही त्यांचे सल्लागार व अधिकारी याबाबतची टिपणी देत असतात. पण ट्रम्प ही टिपणी कधीच वाचत नाहीत. उलट उत्स्फूर्तपणे, त्या-त्या क्षणी सुचेल ते बोलून ते मोकळे होतात. पण या मनमानीचे दणके मात्र अमेरिकी प्रशासनास बसताहेत. तुघलकी वृत्तीच्या या ट्रम्प महाशयांनी अमेरिकी सरकार, धोरणकर्ते आणि अमेरिकी नागरिकांनाही अडचणीत आणण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे आता या ट्रम्प महाशयांना रोखायचे कसे, असा प्रश्‍न सर्वांनाच पडला आहे.