‘मनरेगा’ हा तर भिकारी तयार करण्याचा कारखाना

0

पुणे । ‘महात्मा गांधींनी खेड्यांच्या स्वावलंबनावर भर दिला होता. परंतु, खेड्यांना स्वावलंबाकडे नेण्याऐवजी ’मनरेगा’सारख्या शासकीय योजना राबवून ग्रामीण जनतेच्या स्वाभिमानास ठेच पोहोचवली जात आहे. मनरेगा योजनेचे वर्णनच करावयाचे झाल्यास ’भिकारी तयार करण्याचा कारखाना’ एवढीच ती होऊ शकेल,’ अशी खरमरीत टीका महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी केली आहे. वक्तृत्वोत्तेजक सभेच्या सहकार्याने साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिरातर्फे आयोजित वसंत व्याख्यानमालेच्या उद्घाटनाच्या दिवशी गांधी बोलत होते. ’सद्य परिस्थिती आणि महात्मा गांधी’ या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले. या वेळी साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिराचे अध्यक्ष रवींद्र माळवदकर, कार्याध्यक्ष भाई कात्रे, अन्वर राजन आदी उपस्थित होते.

म्हणूनच लोकशाहीची इमारत उभी
गांधी म्हणाले, ’स्वातंत्र्यानंतर भारताने काय प्रगती केली, असा प्रश्‍न उपस्थित करून जणू काही प्रगतीच झालेली नाही, असे चित्र अलीकडे उभे केले जाते. विशेष म्हणजे, त्यास पंडित नेहरुंना जबाबदार ठरवले जाते. परंतु, हे पूर्णतः चुकीचे आहे. नेहरु, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या राष्ट्रपुरुषांनी भारतीय राज्यघटनेचा पाया मजबूत केला. आज भारतात लोकशाही व्यवस्था अस्तित्वात असण्याचे श्रेय या राष्ट्रपुरुषांनाच द्यावे लागेल. हा पाया मजबूत आहे म्हणूनच लोकशाहीची इमारत आज उभी आहे.’

जनता धारिष्ट्य गमावून बसली
गांधी म्हणाले, ’ग्रामीण जनतेच्या सर्वांगीण सक्षमीकरणाऐवजी त्यांना ऐतखाऊ आणि आळशी बनविले जात आहे. आज अनेक एकरांत जमीन असलेले शेतकरी, सुशिक्षित तरुणदेखील ’मनरेगा’ आणि इतर सरकारी योजनांद्वारे मिळणार्‍या मानधनात समाधान मानत आहेत. ठरलेल्या मानधनापेक्षा ठेकेदाराने कमिशनपोटी काही रक्कम कापून घेतल्यास त्याला विरोध करण्याचे धारिष्ट्यदेखील आज ग्रामीण जनता गमावून बसली आहे.’