मनसेचा ‘देवा’साठी ‘यशराज’ला इशारा

0

मुंबई : मराठी चित्रपटांना प्राइम टाइम मिळण्याच्या मुद्द्यावर मनसे पुन्हा आक्रमक झाली आहे. देवा या मराठी चित्रपटासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत अमेय खोपकर यांनी यशराज फिल्म्सवर निशाणा साधला. महाराष्ट्रात हिंदी निर्मात्यांची मुजोरी खपवून घेतली जाणार नाही. कोणत्याही मराठी चित्रपटासोबत स्क्रीन्स शेअर न करण्याचा यशराज फिल्म्सचा डाव उधळून लावू. जर ही मुजोरी कायम राहिली तर, महाराष्ट्रात यशराजच्या चित्रपटांचे चित्रीकरण होऊ दिले जाणार नाही, असा इशारा खोपकर यांनी दिला. यावेळी अभिनेता अंकुश चौधरी आणि काही मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.

तावडेंशी बोलणे झाले
महाराष्ट्रात मराठी चित्रपटांनाच स्क्रीन्स मिळवण्यासाठी इतरांसमोर हात पसरण्याची वेळ येणे ही एक शोकांतिकाच आहे, असे मत खोपकर यांनी मांडले. ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाला आपला विरोध नसून यशराज फिल्म्स या निर्मिती संस्थेला मात्र आपला तीव्र विरोध असल्याचे ते म्हणाले. ‘हो आम्ही चित्रपटाच्या निर्मिती संस्थेला धमकी दिली’, असे खोपकर म्हणाले. सांस्कृतिक मंत्री विनोद तावडेंसोबत आमचे बोलणे झाले असून, आता पुढे मल्टिप्लेक्सच्या मालकांसोबतही आम्ही चर्चा करणार असल्याचे खोपकर यांनी स्पष्ट केले.