मनसेचे महापालिकेत ‘मराठी’साठी आंदोलन

0

इंग्रजी पाट्यांना काळे फासून केला निषेध

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने मराठी भाषा वापरासाठी आज आंदोलन करण्यात आले. यावेळी महापालिका भवनातील इंग्रजी पाट्यांवर शाई फेकत काळे फासून प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला. मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी शहर सचिव राजू सावळे, रूपेश पटेकर, विभाग प्रमुख अंकुश तापकीर, विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष हेमंत डांगे, के.के.कांबळे, सिमा बेलापूरकर, अक्षय नाळे, अश्‍विनी बांगर, विद्या कुलकर्णी, नारायण पठारे, मयुर चिंचवडे, चंद्रकांत दाणवले, विशाल मानकरी आदी कार्यकर्ते उपस्थित होते. याबाबत पालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रविण अष्टीकर यांना निवेदन देण्यात आले.

आदेशाची पायमल्ली
या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात मराठीचा वापर करण्याबाबत अध्यादेश काढण्यात आला आहे. सर्वांनी हा अध्यादेशाचे पालन करणे गरजेचे आहे. मात्र पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून या आदेशाची पायमल्ली होते आहे. शासनाच्या आदेशानुसार महापालिकेच्या कामकाजात मराठीचा वापर केलाच पाहिजे. पालिकेतील निविदा प्रक्रीया, ठेकेदारांचे करार, तसेच कामाचा आदेश हे मराठीत दिले गेले पालिजे. महापालिका भवनातील प्रत्येक फलक हा मराठीतच असला पाहिजे. येत्या 15 दिवसांत याची अंमलबजावनी न केल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल. त्यानंतर पालिका भवनातील चौथ्या मजल्यावर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान येथे असलेल्या कॉम्प्युटर सर्व्हर रूमच्या इंग्रजी पाटीला तसेच संगणक विभाग प्रमुख निळकंठ पोमण यांच्या कार्यालयाबाहेरील इंग्रजीतील फलकावर शाई फेकत काळे फासण्यात आले.