जळगाववरून मुंबईला पहाटे 4.30 ला ठाणे स्टेशनला उतरलो. मेगा ब्लॉक असल्यामुळे लोकल ट्रेन उशिरा होती. बसल्याबसल्या पहाटेच्या वेळी पोटापाण्यासाठी निघणार्या चाकरमानी आणि सर्व येणार्या जाणार्या माणसांचे निरीक्षण करत होते. प्रत्येकजण आपापल्या धुंदीत काहीतरी विचारात आपल्या लोकलची वाट बघत होता. मी ही काहीतरी भविष्याचा विचार करत होते. तेवढ्यात एक आवाजाने माझी तंद्री तुटली.
एक 35 -40 वयोगटातील बाई मोठ्या किंचाळत इकडून तिकडे धावत होती. एकदम साधी, साडी घातलेली, डोक्यावर नेटका पदर घेतलेला. एकटीच माझ्या पलीकडील प्लॅटफॉर्म वर खूप मोठ्या आवाजात काहीतरी बडबड करत मध्येच मोठयाने हसत होती. कोणालातरी शिव्या देत इकडून तिकडून फिरत होती. तिच्या सोबत ही कोणीच नव्हते. स्टेशन सर्वजण तिच्याकडे पाहत होते .कोणी तिला पाहून हसत होते, कोणाच्या चेहर्यावर तिच्याबद्दल दयेचे भाव दिसत होते तर कोणी तिला पाहून काहीच वाटत नाही अश्या अविर्भावात आपल्या फोन मध्ये. तिला पाहून मी खूप अस्वस्थ झाले.
माझ्या मनात विचारांचे काहूर माजले. हिला काय झाले असेल? ही कुठेन आली असेल? हिच्या आयुष्यात काय घडले असेल? हिच्या सोबत कोणीच का नाही, ही कुठे जाणार? आणखीन हिच्या सोबत काय होणार? ती मात्र तशीच बडबडत प्लॅटफॉर्म वर फिरत होती. मी तिच्यासाठी काहीच करू शकत नाही हा विचार मनात घेऊन ट्रेन मध्ये चढले. मुंबई असो किंवा कुठेही अशी अनेक उदाहरणे आपल्याला नेहमीच पाहायला मिळतात. त्यांची बडबड अनेकांना असंबद्ध वाटते पण त्या मागे खूप काही कारणे असू शकतात. त्यांच्या आयुष्यात घडलेल्या मनावर आघात करणार्या घटना असतात. मनोरुग्ण म्हणून आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो पण ती ही माणसेच आहेत त्यांनाही भावना आहेत हे कुठेतरी विसरतो. पण योग्य ती ट्रीटमेंट आणि आपल्या माणसाच्या प्रेमाने, साथीने ही माणसे ठीक होऊ शकतात.आज अनेक संस्था आणि लोकं अशा लोकांसाठी खूप चांगले काम करत आहेत, मात्र हे काम मोठ्या प्रमाणावर होणे आवश्यक आहे. जे हे काम करत आहेत त्यांना खरंच मनापासून सलाम करावासा वाटतो.
पण लोकांना अशा प्रकारचा मनाचा रोग का लागतो? हा प्रश्न खरोखर चिंता करण्यासारखा आहे. मागे एक साऊथ इंडियामधील व्हिडियो पाहिलेला. एक माणूस जो आपले काम झाल्यावर सकाळी आणि संध्याकाळी आपले आयुष्य केवळ मनोरुग्णांसाठी समर्पित करत फिरत असलेला यात दाखवलेले. सोलापूरचे आतिष दादा यांचं मनोरुग्णांसाठीचे सुरू असलेले काम त्यात येणार्या अडचणी निलेशने लिहिलेल्या एका लेखात वाचायला मिळालेलं. खरतर अस काम करणारे लोकं आणि संस्थांना मोठ्या प्रमाणावर मोटिव्हेट करणे आवश्यक आहे. मनोरुग्णांची अशी अवस्था व्हायला खरेतर घरची लोकं सर्वाधिक जबाबदार वाटतात. मानसिक रोगी झाले म्हणून अशा लोकांना न सांभाळणार्या लोकांची खरेतर मानसिक तपासणी करणे गरजेचे आहे. अशा काळात सर्वाधिक गरज असलेले घरचे लोकं यांना असे वार्यावर सोडून मोकळे होतात हे दुर्दैवीच म्हणावे लागेल.
– पल्लवी पवार,नवी मुंबई
8208133030