जळगाव । जी व्यक्ती कुटुंबात सुखी व आनंदी आहे, ती कामाच्या ठिकाणी ताण तणावावरही मात कर करते. मनाने प्रसन्न राहिलात तर तणावच काय 70 टक्के आजार तुमच्यापासून दूर पळतील असा विश्वास संमोहन तज्ज्ञ नवनाथ गायकवाड यांनी व्यक्त करुन पोलीस अधिकारी व कर्मचार्यांना तणावमुक्तीचे धडे दिले. यावेळी पोलिस अधिकारी, कर्मचारी, कुटुंबिय उपस्थित होते.
पोलीस अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबासाठी पोलीस दलातर्फे बुधवारी ‘संवाद कौशल्य व तणाव व्यवस्थान’ या विषयावर कार्यशाळा झाली. मंगलम सभागृहात झालेल्या या कार्यशाळेचे उद्घाटन दीपप्रज्वालनाने झाले. पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, संमोहन तज्ज्ञ नवनाथ गायकवाड, पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे, रशिद तडवी, पोलीस निरीक्षक सुनील कुराडे व या अधिकाजयांच्या सौभाग्यवतींच्याहस्ते एकत्रित दीपप्रज्वालन करण्यात आले. ही कार्यशाळा दिवसभर चालली.
जनता हेच दैवत
सामान्य जनता हीच आपले दैवत आहे, हे पोलीस असो की अन्य कोणताही सरकारी अधिकारी व कर्मचार्यांनी आधी समजून घ्यावे. त्यांच्या सेवेसाठीच आपली नियुक्ती झालेली आहे. आपण करीत असलेले काम व खेड्यात मजुराला मिळणारे काम व त्यापासून मिळणारा मोबदला याची तुलना करा. अनेक बेरोजगार नोकरीच्या रांगेत आहेत, ते आपल्या जागेवर येण्याची स्वप्न पाहत आहेत. त्यामुळे जे काम मिळाले ते घरचे काम समजून केले व तशी मनाची तयारी केली तर कामाच्या ठिकाणी कोणताच ताणतणाव येणार नाही असे गायकवाड म्हणाले. जो करतो, त्यालाच जास्त काम लावले जाते असे अनेक जणांकडून बोलले जात, मात्र त्याचा नीट विचार केला तर आपल्यामध्ये काम करण्याची क्षमता आहे व त्या कामाला आपण न्याय देऊ शकतो ही त्यामागे वरिष्ठांची भावना असते. काम चुकारांना कधी काम सांगितले जात नाही असेही गायकवाड यांनी काही उदारहरणासहित स्पष्ट केले.
सकारात्मक दृष्टिकोण ठेवा
बाह्य सौंदर्यापेक्षा आंतरिक सौंदर्यच महत्त्वाचे आहे. तुम्ही कसे दिसतात याला महत्त्व नाही, तर तुमच्या कामाची पध्दत कशी, तुमच्यातील क्षमता, कौशल्य याला महत्व आहे. सकारात्मक दृष्टिकोण ठेवा, उगाच रडत बसू नका. आपण आहोत तिथे सुखी आहोत असे विचार ठेवल्याने तणावातून मुक्तता मिळते. पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी मानसिक संतुलन ढासाळणार नाही. कौटुंबिक जीवन सुस्थितीत रहावे यासाठी कर्मचाजयांनी कुटुंब कार्यालयात तणावमुक्त राहण्याचा सल्ला दिला.