नवी दिल्ली । भारतीय संघाची फलंदाजीची बाजू किती मजबूत आहे हे जगजाहीर आहे. परंतु, त्याचे आणखी एक प्रत्यंतर काल श्रीलंकेविरुद्धच्या एकमेव टी-20 लढतीत आले. विजयासाठी 171 धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि लोकेश राहुल हे दोघेही लवकर तंबूत परतल्यामुळे भारताची सुरुवात अडखळती झाली होती. परंतु, सूर गवसलेला विराट कोहली आणि मनीष पांडे यांनी पाहता पाहता श्रीलंकेच्या हातून सामना खेचून घेतला. विराटने केवळ 54 चेंडूंत 82 धावा फटकावत भारताला विजयाकडे नेले. परंतु, मनीष पांडेने त्याला साथ देताना केवळ 36 चेंडूंत नाबाद 51 धावा फटकावीत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. अखेरच्या क्षणी विराट बाद झाल्यामुळे खेळपट्टीवर उतरावे लागलेल्या धोनीनेही मग विजयी धाव घेण्याचा आणि त्यातून आपले अर्धशतक झळकावण्याचा मानही मनीष पांडेलाच दिला. परंतु, मनीष पांडे त्यावर समाधानी नाही.
बदली गोलंदाज असल्यामुळे केदार जाधवला अधिक संधी मिळत असल्याचे शल्य त्याला कोठेतरी जाणवते आहे. परंतु, फलंदाजीतील कौशल्य आणि क्षमता या निकषावर आपल्याला अधिक संधी मिळायला हवी, असे त्याचे मत आहे. आगामी काळात त्याची अपेक्षा कितपत पूर्ण होते याची त्याच्या पाठीराख्यांना उत्सुकता आहे. पांडेने गेल्या वर्षी आपल्या पहिल्याच एकदिवसीय सामन्यात अर्धशतकी खेळी केली होती. भविष्यात संधी मिळाल्यास तो अशीच सातत्यपूर्ण कामगिरी करेल अशी आशा करू या.