फैजपूर : आत्मा हा सत्यस्वरूप, ज्ञानी, आनंदी व सर्वश्रेष्ठ आहे. परंतु ज्या प्राण्याला जसा देह मिळाला त्या देहानुसार भावना बदलत असल्याने आत्मभावना व देहभावना यात फरक दिसून येतो. यासाठी मनुष्यजन्मात असतांना आत्मभावना देवाचीच असली पाहिजे. म्हणजेच भक्तीप्रेमस्थिती ही सर्वोच्च स्थिती गाठली पाहिजे. वारकरी संप्रदाय याच मार्गाने वाटचाल करणारा असून आत्मस्थिती देखील ओलांडण्याची ताकद वारकरी संप्रदायात असल्याचे प्रतिपादन श्रीक्षेत्र आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हभप संदिपान महाराज शिंदे-पाटील यांनी येथे केले. फैजपूर येथे 26 डिसेंबरपासून श्रीएकनाथी पारायण व नामसंकीर्तन सोहळा सुरू असून त्याअंतर्गत चौथ्या दिवशीच्या कीर्तनात आम्ही कामक्रोध वाहिले विठ्ठला या संत तुकाराम महाराज यांच्या अभंगावर हभप संदिपान महाराज यांनी चिंतन केले.
वारकरी संप्रदाय सर्वोत्कृष्ट
हभप संदिपान महाराज कीर्तनात म्हणाले की, भारतीय संस्कृती जगातील सर्वोच्च व त्यागी संस्कृती असून तिने उच्च तत्वे धारण केली आहेत. वारकरी संप्रदाय म्हणजे चिंधीमध्ये बांधलेला हिरा आहे. त्यांचे बोलणे, चालणे, वागणे यात काहीही फरक नाही. पाच विषयांच्या दारामध्ये भीक न मागता शहाण्या माणसाने योग्य ध्येय ठरवावे. जी अपेक्षा पूर्ण झाल्यानंतर कोणतीच अपेक्षा शिल्लक राहत नाही ती अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे. म्हणजेच जीवाची आत्मस्थिती गाठावी. मात्र जीवाची आत्मस्थिती परमात्म्याची प्राप्ती होवूनही त्यापलिके जाणारे संत वारकरी संप्रदायात होवून गेल्याने वारकरी संप्रदाय हा सर्वोत्कृष्ट संप्रदाय असल्याचे हभप संदिपान महाराज यांनी सांगितले. फैजपूर येथील बसस्थानकालगत 26 डिसेंबर ते 4 जानेवारी दरम्यान सप्ताह सुरू आहे. वै. नथ्थूसिंग बाबा राजपूत यांचे जन्मशताब्दी वर्ष, श्रीक्षेत्र आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थेचे शताब्दी वर्ष, गिंबर महाराज वारकरी संप्रदायिक शिक्षण प्रसारक समिती श्रीक्षेत्र पंढरपूर या संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष आणि नथ्थूसिंग बाबा यांच्या दौर्याचा भक्तीप्रवाह यानिमित्ताने श्रीएकनाथी भागवत पारायण व नामसंकीर्तन सप्ताह सुरू आहे.
काल्याचे कीर्तन व महाप्रसादाने होणार सांगता
वारकरी शिक्षण संस्था आळंदी येथील अध्यापक उल्हास महाराज सूर्यवंशी, श्रीक्षेत्र कुंलेश्वर संस्थान बेळीचे अध्यक्ष भरत महाराज पाटील, श्रीसंत मिराबाई संस्थानचे कन्हैय्या महाराज राजपूत, श्रीक्षेत्र आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संदिपान महाराज, श्रीक्षेत्र आळंदी येथील उमेश महाराज दाशरथे, श्रीक्षेत्र देहू येथील गाथा मंदिराचे अध्यक्ष पुंरंग महाराज घुले यांची कीर्तने झाली. रविवार 1 जानेवारी श्रीसंत एकनाथ महराज यांचे सतरावे वंशज योगीराज महाराज गोसावी, 2 रोजी बार्शी येथील अनिल महाराज, 3 रोजी श्रीक्षेत्र पंढरपूर येथील देगलूरकर संस्थानचे चैतन्य महाराज देगलूरकर यांची कीर्तने दररोज रात्री 8 ते 10 वाजेदरम्यान होणार आहेत. सप्ताहाच्या समारोपात 4 रोजी सकाळी 9 ते 11 वाजेदरम्यान हभप चैतन्य महाराज देगलूरकर यांचे काल्याचे कीर्तन व त्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे. भाविकांनी लाभ यावा, असे आवाहन आयोजक श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ समितीतर्फे अध्यक्ष चोलदास पाटील, समितीचे सचिव तथा मसाका संचालक नरेंद्र विष्णू नारखेे यांच्यासह समिती पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे.