पुणे : ‘मान न करिये गोरी… प्यारी लाडसी झुली लाडली लाडकरे… उमड घन घुमड…’ यांसारख्या विलंबित आणि दृत रचना सादर करीत पद्मश्री पं.उल्हास कशाळकर यांनी रसिकांची मने जिंकली. कशाळकर यांना तालयोगी पं.सुरेश तळवलकर यांनी केलेल्या तबल्याच्या साथीने रसिकांना दोन दिग्गजांच्या कलाकृतीचा अनोखा मेळ अनुभवायला मिळाला. त्यासोबतच गायिका मंजुषा कुलकर्णी पाटील यांच्या गायनाला देखील श्रोत्यांनी भरभरून दाद दिली.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त गणेश कला क्रीडा मंच येथे सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
श्री रागातील मनोहारी बंदिशींनी मंजुषा पाटील यांनी गायनसेवेला प्रारंभ केला. विविध तालांतील त्यांनी सादर केलेल्या रचनांना उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात उर्त्स्फूत दाद दिली. ‘जोहार मायबाप जोहार, तुमच्या महाराचा मी महार…’ ही संत चोखामेळा यांची रचना रसिकांच्या विशेष पसंतीस उतरली. पाटील यांना रसिका वैशंपायन, सायली पाटील (तानपुरा), प्रशांत पांडव (तबला) यांनी साथसंगत केली.
गायन मैफलीच्या उत्तरार्धात पं. कशाळकर यांनी मेघमल्हार रागातील ‘गरज घटा घन…’ ही रचना सादर करताच वर्षाॠतूच्या अनोख्या रंगांचे दर्शन घडले. पं. सुरेश तळवलकर यांच्या तबल्याच्या साथीने ही गानमैफल उत्तरोत्तर रंगत गेली. मैफलीची सांगता ‘तुम हो जगतके…’ या भैरवीने झाली. श्रीराम हसबनीस (हार्मोनियम), साई ऐश्वर्य महाशद्बे, सौरभ नाईक (तानपुरा) यांनी साथसंगत केली.