समाजाचेच एक अविभाज्य अंग म्हणजे अध्यात्म असं म्हटलं तर नक्कीच अतिशयोक्ती ठरणार नाही. त्याचं कारण म्हणजे माणसांच्या समुहाचा समाज बनतो तर त्या समुहातील विविध व्यक्तिरेखा या आपापल्या संस्कारांची शिदोरी घेऊनच वावरत असते. व्यक्तीच्या हालचाली म्हणा किंवा त्यांची कर्म म्हणा ही त्यांच्यावरील संस्कारातून होत असतात. हे संस्कार समाजाकडून होतात, घरातून होतात, याचवेळी ज्याच्या संपर्कात सतत येतो त्याचा वाण नाही पण गुण अंगी येतोच. त्यामुळे समाजापासून ना राजकारण वेगळं, ना अर्थकारण वेगळं, ना अध्यात्म वेगळं. एका समाजाचेच हे सर्व रंग. मात्र, मध्यंतरीच्या काळात अध्यात्माचा बागुलबुवा उभा करण्यात आला. शब्द पांडित्य वाढलं आणि सर्वसामान्य माणसं यापासून दुरावली. तसंच पैसा हे केंद्रबिंदू मानून सहज कष्ट न करता वेगवेगळ्या धर्माच्या नावाचा टिळा लावून म्हणायला संन्यासी पण प्रत्यक्षात पैसा मिळवण्याचा उद्देश ठेवून त्यांनी भाबड्या, देवभोळ्या मंडळींवर जाळं टाकलं आणि त्यात अडकवण्याचा प्रयत्न सुरू केला. समाजातही एक वर्ग होताच ज्याला कष्टाविना एका रात्रीत श्रीमंतीचा राजमार्ग हवा होता, गुप्तधनाचे प्रलोभन… यास अनेकजण बळी पडले, यामुळे कोणताही संबंध नसताना गालबोट लागले ते अध्यात्मालाच. जीवन साधेपणाने, सरळसोपे कसे जगता येईल आणि जे माझे आहे, ते दुस-याचेही आहे, त्याचाही हक्क आहे, याची जाणीव करून देणारं, माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवणारं अध्यात्म बाजूला पडलं. जसा कॉम्प्यूटरमध्ये वायरस शिरतो तसाच या धार्मिक संस्कारातही शिरलाच. उगाचच नको तेवढं बोजडपण वाढवलं गेलं, नको तेवढं बाजारीकरण झालं, त्यामुळं समाज यापासून दूर गेला. मोठाले पांडित्य मांडणा-या ग्रंथांवर धुळ चढत गेली आणि आमच्या डोक्यातील जळमट वाढत गेली.
जीवनात सर्वच अनुभव आपण स्वत:घेऊन शिकायचं म्हटलं तर एक जन्म कमीच पडणार. त्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागेल. म्हणूनच काही अनुभव पुस्तकातून घ्यावेत, काही दुस-याचं पाहून शिकावं आणि आपल्याला स्वत:ला जगण्याच्या धडपडीत काही बरे बाईट अनुभव येत असतातच. या महाराष्ट्राच्या भूमीत अध्यात्मिक अनुभवांचं गाठोडं खच्चून भरलेलं आहे. या मातीतल्या संत मंडळींनी जे भरभरून ज्ञान दिलंय, जी शिकवण दिलीय तिला तोड नाही. सामान्यातल्या समान्यजनांचं जगणं सुलभ करण्याचा प्रयत्न त्यांनी केला.देव माणसात शोधण्यास त्यांनी सांगितलं. मात्र, मध्यंतरीच्या भेसळीतूनच भेदाभेद आपण शुद्रबुद्धीने केले. स्वत:च्या रोजी रोटीचा विचार वाढला, स्वार्थ बळावला आणि देवातही फुट पाडून त्यांना वाटून घेतलं आणि सुरू झाली ती दुकानदारी… हे चित्र केवळ महाराष्ट्रापुरतं मर्यादीत नाही, अवघ्या हिंदुस्तानात आहे. पूर्व ते पश्चिम आणि उत्तर ते दक्षिण सर्वत्र अनुभव सारखेच. मात्र, अध्यात्मातील दाखले कोणत्याही धर्मातील ग्रंथांमध्ये, पुस्तकांमध्ये किंवा संतांच्या शिकवणुकीत पाहिले तर एक समान धागाच दिसतो. यापैकी कोणीही एकमेकांचा द्वेष करण्यास सांगितलेलं नाही. एक धर्म वाढवण्यासाठी दुसरा धर्म बुडवण्याची शिकवण दिलेली नाही. जे काही सद्या समाजात विष दिसतंय ते आपल्यातीलच काहींच्या स्वार्थी कुबुद्धीच्या मंथनातून निर्माण झालेलं आहे. समुद्र मंथनातून विष आणि अमृत हे दोन्ही बाहेर आलं, पण तेव्हा विष पचवणारा भोलेनाथ होता. आता हे विष पचवणारा कुणीच नाही म्हणून ते विष पाझरतंय ते जिथं खोलवर पाझरलं जाईल तिथं तिथं विनाश, संहार, अत्याचार, होतो ही भावना. यावर जालीम उपाय काय तर माणसातील सदसद् विवेक बुद्दी जागृत होणं महत्त्वाचं, त्यासाठी सात्विक विचार आत अगदी तळापर्यंत रूजवणं महत्त्वाचं. आपण एखादी कृती विचारपूर्वक करतो…
या सदरा अंतर्गत आपण आता भेटत राहणारच आहोत, भारतातील अनेक स्थळ आहेत, जी आजही आपले दिव्यत्त्व राखून आहेत, अनेक अद्भूत अनुभव तिथं जाणवतात. अनेक महात्मे आहेत, जे हजारो वर्षांच्या परंपरेचं जतन आणि संवर्धन करताहेत, मानव कल्याण हाच त्यांचा हेतू आहे. आजही माणुसकीचा ओलावा शिल्लक आहे, अत्यंत हलाखिच्या स्थितीत स्वत: राहूनही आपल्या ताटतल्या अर्ध्या भाकरीतून पाव तुकडा भाकरी दुस-याला देताहेत. ठिकठिकाणी माणसातला माणूस जागृत करणारे साक्षात्कार होतात आणि तेव्हाच या भारत देशाचं वैविध्य आणि सांस्कृतिक अध्यात्मिक वैभव काय आहे याची जाणीव होते. गरज आहे ती केवळ व्यस्त जीवनातील काही काळ त्यांच्यात वावरण्याची!
– सुमेधा उपाध्ये