ममतांना व्हायचंय पंतप्रधान
कोलकाता : यूपीएच्या नेत्या सोनिया गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नुकतीच भेट घेतल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी ममतांवर जोरदार हल्ला चढवला आहे. ममता या सरड्यासारख्या रंग बदलणार्या आहेत. त्यांच्यावर काडीचाही विश्वास ठेवू शकत नाही. काँग्रेस आणि अन्य नेत्यांनी त्यांच्यावर भरवसा ठेवू नये. ममतांमध्ये पंतप्रधानपदाची लालसा निर्माण झालेली आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
ममता या ’ट्रोझन हॉर्स’सारख्या स्वार्थासाठी इतरांचा वापर करून घेतात. सध्या तरी त्यांचे वागणे असेच आहे. संघाचे विचार मांडून त्या एकत्र आलेल्या विरोधकांना पुन्हा वेगळे करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे सांगून त्यांच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका, असे आवाहन चौधरी यांनी अन्य पक्षांच्या नेत्यांना केले आहे. देशाचे पंतप्रधान होणे हा ममतांचा एकमेव उद्देश आहे. पंतप्रधानपदाची लालसा निर्माण झाली आहे. त्यांच्यात देवेगौडा आणि इंद्रकुमार गुजराल यांची लक्षणे आहेत. पश्चिम बंगालमधून काँग्रेसला हद्दपार करण्याचा आणि पुढील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे समर्थन मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असा आरोपही त्यांनी केला.
पश्चिम बंगालमध्ये ममता अधिक जागा पदरी पाडून घेण्याचा प्रयत्न करत असून, पुढील लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदासाठी दावा करु शकतात. एकीकडे राहुल गांधी विरोधकांना एकत्र आणण्यासाठी चर्चा करत आहेत, तर ममता तिसर्या आघाडीची चर्चा करून विरोधकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.