ममुराबादेत 19 लाखांचा घोटाळा : हजाराचे बाक 10 हजारांत, 49 हजाराच्या संगणकाची 92 हजारांत खरेदी
अपहाराची चौका-चौकात चर्चा : सरपंच हेमंत चौधरी आणि ग्रामसेवक मुरलीधर उशीर यांचेविरोधात तक्रार
जळगाव : शहरापासून अवघ्या पाच किलोमिटर अंतरावर असलेल्या तालुक्यातील ममुराबाद गावात सध्या सरपंच हेमंत गोविंद चौधरी आणि ग्रामसेवक मुरलीधर उशीर यांनी केलेल्या कथित गैरव्यवहाराची चर्चा गावातील चौका,चौकात रंगतदार पध्दतीने सुरू आहे. ग्रामपंचायतीने चौदाव्या वित्त आयोगाच्या पैशातून तकलादू वस्तुंची खरेदी ब्रंडेंड किंमतीपेक्षा अधिकची रक्कम देऊन केल्यामुळे सुमारे अठरा ते वीस लाखांचा अपहार आणि गैरव्यवहार केल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे,जळगावसारखे जिल्ह्याचे ठिकाण जवळच असताना गैरव्यवहाराच्या उद्देशाने धरणगाव,रावेर आणि शिंदखेडा येथील पुरवठाधारकांकडून खरेदी केली आहे.
गैरव्यवहाराची सविस्तर तक्रार
जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथील ग्रामपंचायत सदस्या प्रितम ज्ञानेश्वर पाटील यांनी या गैरव्यवहाराची सविस्तर तक्रार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांना दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, सरपंच आणि ग्रामसेवक यांनी चौदाव्या वित्त आयोगाच्या मंजूर झालेल्या रक्कमेतून गावातील मराठी,उर्दू शाळांसाठी संगणक,पंखे,विद्यार्थ्यांना बसण्याचे बेंच,कपाट, प्लास्टिक खुर्ची आदी साहित्य खरेदी करण्यात आले आहे. या साहित्यांच्या किंमती पहाता कोणत्याही ब्रंडेड किंमतीपेक्षा अधिकची आहेत. तसेच गावातील महिला बचत गटांना दोन दिवस दोन तासांचे प्रशिक्षण दिले, त्यावर एक लाख 80 हजार एवढा अवाढव्य खर्च करण्यात आला आहे. त्यातही मोठ्या रक्कमेचा अपहार झाला आहे. ग्रामपंचायतीने शाळेसाठी जुन्या व्हर्जनचा संगणक खरेदी केला आहे. त्या संगणकाची मुळ किंमत अधिकृत डिलरकडे 49 हजार 500 रुपये असताना, ग्रामपंचायतीने तो 92 हजारात खरेदी केला आहे. विद्यार्थ्यांना बसण्यासाठीचे दिड हजाराचे बेंच दहा हजारात एक खरेदी केला आहे. चारशे रूपयांची प्लास्टिक खुर्ची सहाशे रूपयात, तीन हजाराचे लोखंडी कपाट पंधरा हजारात खरेदी केले. या सर्व खरेदी, गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराला माझा विरोध होता. तथापि, तो ग्रामविकास अधिकार्याने नोंदवून घेतला नाही. त्यानंतर मी तक्रार अर्ज केला आहे, असे सदस्य प्रितम पाटील यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
वरिष्ठ पातळीवर चौकशीची मागणी
ममुराबाद ग्रामपंचायतीने चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीचा पुरेपुर गैरवापर आणि अपहार केला आहे. या सर्व अपहारास सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी हे दोन्ही जबाबदार आहे. त्यामुळे या भ्रष्टाचाराची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करावी आणि दोषींविरूध्द अपहाराचा गुन्हा दाखल करण्याची मागणी प्रितम पाटील यांनी केली आहे.