मरणाची आठवण ठेवल्यास बदलेल जीवनपद्धती – हभप भाऊराव महाराज

0

यावल । जीवन जगत असतांना अनेक चांगल्या वाईट गोष्टी घडत असतात. मनुष्य देह हा परमात्म्याची प्राप्ती करण्यासाठी उत्तम साधन आहे. हे एकदा कळले की, जीवनाचे ध्येय आपल्या लक्षात येते. मरणाची आठवण प्रत्येक वेळी ठेवल्यास जीवनाचे मोल कळून जीवन जगण्याची पद्धत देखील बदलते, असे प्रतिपादन हभप भाऊराव महाराज यांनी न्हावी येथे आयोजित कीर्तन सोहळ्यात केले.

हभप भाऊराव महाराज यांनी संत तुकाराम महाराज यांच्या अभंगावर चिंतन केले. प्रारंभी ललित फिरके व भरत फिरके यांनी महाराजांचे स्वागत केले. महाराज म्हणाले की, अनेक रूढी-परंपरा आपण त्यांची सत्य असत्यता न तपासता पूर्वजांच्या सांगण्यानुसार अद्यापपर्यंत पाळत आलो आहोत. काही अंधश्रद्धा आहेत मात्र काही आपल्या भारतीय संस्कृतीला जोपासणार्‍या रूढी व परंपरा आहेत. अशा परंपरांचे जतन करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. देवाची प्राप्ती करण्यासाठी दिलेला मनुष्य देह जगत असतांना विषयभोगात रममाण न होता परमार्थ गोड करण्याची गरज असल्याचे भाऊराव महाराज यांनी कीर्तनातून सांगितले. यशस्वीतेसाठी फिरके परिवाराने परीश्रम घेतले. कीर्तनाला न्हावीसह परिसरातील भाविकांची उपस्थिती होती.