विविध उपक्रमांचे आयोजन
नवी सांगवी : पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघ संचलित मराठवाडा चॅरीटेबल ट्रस्ट एकसंघ समितीचा 6 वा वर्धापनदिन सोहळा विविध सामाजिक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. आपण समाजाचे काही देणे लागतो, याचे भान ठेवून सामाजिक जाणीवेतून वृक्षसंवर्धनासाठी पिंपरी-चिंचवडमधील झाडांना वॉटर टॅकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. तसेच कासारवाडी येथील श्री साईदत्त मंदिर गोशाळा येथील गायींसाठी ट्रकभर चारा देण्यात आला. पिंपळे गुरवमधील संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक संघास झाडे आणि झाडांना पाणी घालण्यासाठी झारींचे वाटप करण्यात आले. याबरोबरच पिंपरी-चिंचवड प्लास्टिक कचरामुक्त व्हावे, यासाठी स्वच्छता विषयक प्रबोधन करून कापडी व कागदी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास आमदार लक्ष्मण जगताप, ह.भ.प. शिवानंद महाराज, शिवकीर्तनकार डॉ. गजानन वाव्हळ, समाजप्रबोधनकार शारदा मुंडे, सामाजिक कार्यकर्ते अशोक उमरगेकर, विजुअण्णा जगताप, मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार, नगरसेविका उषा ढोरे, सीमा चौगुले, नगरसेवक सागर अंगोळकर, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष गोपाळ माळेकर, भैरुजी मंडले, सूर्यकांत कुरुलकर, वामन भरगंडे, माधव मनोरे, श्रीकृष्ण फिरके, नवनाथ गीते, आश्रुबा पालवे, हेमंत ननवरे, श्रीकांत आचोळे, शंकर तांबे, सुरेश दिघे, महिपती पाटील, प्रभूलिंग सूर्यवंशी आदी उपस्थित होते. यावेळी शारदा मुंडे यांनी अरुण पवार यांना अविरत सेवा कार्याबद्दल सम्राट अशोकस्तंभ सन्मानचिन्ह भेट देवून सन्मानित केले.
महाराजांची कृती अवघड
प्रा. वाव्हळ महाराज म्हणाले की, माणसाला माणूस म्हणून जगण्याची गरज आहे. पाश्चिमात्य संस्कृती आणि भारतीय संस्कृतीमध्ये खूप फरक आहे. आपण भारतीय संस्कृती जोपासावी. छत्रपती शिवाजी महाराज सर्वाना आवडतात. त्यांच्यासारखे अनेकजण दिसण्याचा प्रयत्न करतात. पण महाराजांची कृती अवघड आहे, म्हणून ती होत नाही. तरुणांनी ती कृती आवडीने करण्याची गरज आहे. शिवानंद महाराज म्हणाले की, मराठवाडा जनविकास संघाची ही गरुड झेप आहे. संघाने गेल्या सहा वर्षात संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरात सामाजिक कार्यात आपला ठसा उमटविला आहे. एकीची शिकवण मराठवाडा जनविकास संघाच्या कार्यातून मिळते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूर्यकांत कुरुलकर यांनी, तर आभार वामन भरगंडे याांनी मानले.