’कोयत्याच्या मुठीत’ या ग्रंथाचे प्रकाशन
पुणे : ऊसाची शेती आणि साखर कारखान्यांच्या जोरावर पश्चिम महाराष्ट्रात निर्माण झालेल्या समृद्धीमागे मराठवाड्यातील ऊस तोडणी कामगारांचे कष्ट आहेत. या ऊसतोडणी कामगारांच्या कुटुंबांना आणि विशेषतः त्यांच्या मुलींना ज्या परिस्थितीला सामोरे जावे लागते, ते अतिशय विदारक सत्य आहे. हे वास्तव लक्षात घेता मराठवाड्याच्या व्यापक विकासाशिवाय महाराष्ट्राची प्रगती अशक्य आहे, असे मत ज्येष्ठ समीक्षक आणि माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. कविता रसिक मंडळीच्या वतीने लेक लाडकी अभियानांतर्गत आयोजित समारंभात अॅड. वर्षा देशपांडे लिखित ’कोयत्याच्या मुठीत’ या ग्रंथाचे डॉ. सबनीस यांच्या हस्ते प्रकाशन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्राचार्य भाऊसाहेब जाधव, कविता रसिक मंडळीचे प्रमुख भूषण कटककर, अॅड. वर्षा देशपांडे, डॉ. राजेंद्र माने, कैलास जाधव, सिंधू ठोंबरे, सीमा बडे आणि सुप्रिया जाधव आदी उपस्थित होते.
विचारांची स्पष्टता जाणवते
या पुस्तकाच्या माध्यमातून खूप महत्त्वाच्या प्रश्नाचे डॉक्युमेंटेशन झाले असून मराठी साहित्यातील हे एक आगळे-वेगळे पुस्तक ठरेल. प्रत्यक्ष अनुभव, समस्या सोडविण्यासाठीचे काम करताना मनात असलेली विचारांची स्पष्टता या सगळ्यातून हे पुस्तक साकारले आहे, हे अधिक महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील सामाजिक चळवळीच्या पार्श्वभूमीवर समकालीन प्रश्न मांडणारा हा एक महत्त्वपूर्ण दस्ताऐवज आहे. बालविवाह हे एक विदारक सत्य आहे. विकासाच्या प्रारूपाला या पुस्तकाच्या माध्यमातून प्रश्नांकीत केले असल्याचे डॉ. श्रीपाल सबनीस यांनी सांगितले.
ऊसतोड कामगारांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न
ऊसदर वाढीसाठी आंदोलन होते, पण ऊसतोड कामगारांच्या वेतनासाठी, सुरक्षेसाठी त्यांच्या विम्यासाठी कोणीही पुढाकार घेताना दिसत नाही, हे दुर्दैव आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ऊसतोड कामगार आणि त्यांच्या कुटुंबांचे प्रश्न पोहोचविण्याच्या उद्देशाने हे पुस्तक लिहिले आहे. बालविवाह हा या क्षेत्रातील महत्त्वाचा प्रश्न आहे. असे अॅड. वर्षा देशपांडे यांनी सांगितले. सोनाली बडे आणि सिंधू ठोंबरे या बालविवाहितांनी अनुभव कथन केले. सुप्रिया जाधव यांनी सूत्रसंचालन, तर वर्षा कुलकर्णी यांनी आभार मानले.