पिंपरी : मुंबई, पुणे परिसरात औद्योगिक वसाहती निर्माण होत असताना तत्कालीन राज्यकर्त्यांनी मराठवाड्याचा विचार केला नाही. त्यामुळे मराठवाड्यातील तरुणांवर कामासाठी स्थलांतरीत होण्याची वेळ आली. मराठवाड्यातील लोकांचे स्थलांतरित होणे ही बाब चिंताजनक आहे. सरकार मराठवाड्याला औद्योगिक गती देण्यासाठी प्रयत्नशील असून त्यानंतर मराठवाड्यातील तरुणांना स्थलांतरीत होण्याची गरज भासणार नाही, असे विचार कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी व्यक्त केले.
मराठवाडा जनविकास संघ संचलित मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्ट पिंपरी-चिंचवड शहराच्यावतीने मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. यानिमित्त ‘मराठवाडा भूषण पुरस्कार’ वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार महेश लांडगे, लातूरचे माजी आमदार शिवाजीराव कवेकर, ज्येष्ठ साहित्यिक डॉ.नागन्नाथ कोतापल्ले, सभागृह नेते एकनाथ पवार, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर, भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथा, माजी उपमहापौर शैलजा मोरे, नगरसेवक बाबा त्रिभुवन, स्वीकृत नगरसेवक गोपाळ माळेकर, कार्यक्रमाचे संयोजक व ट्रस्टचे अध्यक्ष अरुण पवार, आळंदीच्या नगराध्यक्षा वैजयंती उमरगेकर, ह.भ.प. वाघ महाराज, ह.भ.प. तुकाराम महाराज, ह.भ.प. शिवानंद महाराज, शिवव्याख्याते डॉ.गजानन वाव्हळ महाराज, वामन भरगंडे, सूर्यकांत कुरुलकर, माधव मनोरे, दत्तात्रय धोंडगे, शंकर तांबे, नामदेव पवार, नगरसेवक, कार्यकर्ते, मराठवाड्यातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मराठवाडा उशिरा झाला स्वतंत्र
डॉ. नागनाथ कोतापल्ले म्हणाले की, भारत स्वतंत्र झाला, तेव्हा भारतात सहाशे ते सव्वासहाशे संस्थानिक होते. त्यानंतर जवळजवळ सर्वच संस्थानिक स्वतंत्र भारतात विलीन झाले. पण निजामाचा स्वतंत्र भारतात विलीन होण्याला नकार होता. मराठवाडा हा 16 जिल्ह्यांचा मोठा प्रदेश होता. जर मराठवाडा स्वतंत्र भारतात विलीन झालाच नसता, तर मध्य भारताच्या पोटात पुन्हा एक स्वतंत्र राष्ट्र निर्माण झाले असते. हा एक भारतासाठी मोठा धोका होता. म्हणून मराठवाड्यातील लोकांनी लढे उभारले, संघर्ष केला, बलिदान दिले. त्यामुळे मराठवाडा भारताच्या स्वातंत्र्यानंतर एक वर्ष एक महिन्याने स्वतंत्र झाला. आणि भारताच्या स्वातंत्र्याला अर्थ प्राप्त झाला. असे कोतापल्ले यांनी म्हंटले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार प्रा. संपत गर्जे यांनी मानले.