नवी दिल्ली-मराठा आरक्षणाचा मुद्दा मंगळवारी राज्यसभेतही छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी उपस्थित केला. मात्र, त्यावर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. मराठा आरक्षणाची मागणी समजू शकतो, मात्र मुख्यमंत्र्यांना मंदिरात जाण्यापासून रोखणे चुकीचेच आहे, असे मत नायडू त्यांनी व्यक्त केले.
राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला असून आरक्षणासाठी संघटना आक्रमक झाल्या आहेत. राज्यभरात मंगळवारी बंदची हाकही देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यसभेत खासदार संभाजीराजे भोसले यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला.
गेल्या वर्षी अनेक मोर्चे निघाले, त्याची दखल देशाने घेतली. आता मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजातील सर्व घटकांना बोलवावे आणि त्यांच्या मागण्यांवर तोडगा काढावा. तसेच याचे राजकारण करण्यापेक्षा सर्वपक्षीय लोकांना एकत्र आणून तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, अशी माझी मागणी असल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले.