मराठा आरक्षणाबाबत न्यायालय योग्य निर्णय देईल-मुख्यमंत्री

0

पुणे – मराठा समाजाची ताकतीचे दर्शन काही दिवसांपूर्वी मराठा मोर्चातून पाहायला मिळाले. हा जरी मुकमोर्चा असला तरी त्याचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचला असल्याच पुणे येथे आयोजित सारथी संघटनेच्या उद्घाटनावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मराठा आरक्षणाचा विषय न्यायप्रविष्ट आहे. त्या दृष्टिकोनातून आयोगाची शिफारस न्यायालयात सादर केली जाईल. त्या आधारावर न्यायालय योग्य निर्णय घेईल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

गेल्या काही काळात मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी विराट मोर्चे निघाले होते. या मोर्च्याच्या माध्यमातून केलेल्या मागण्या पैकी एक मागणी सारथी संस्थेच्या उद्घाटनाच्या माध्यमातून पूर्ण केली. सारथी संस्थेच्या माध्यमातून मराठा समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. मराठा समाजाच्या शिक्षणाचा आणि रोजगाराचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत असल्याचे ही मुख्यमंत्री म्हणाले. छत्रपती शाहू महाराज यांना अभिप्रेत असलेला समाज घडविण्यासाठी ‘सारथी’ ही संस्था निश्चितपणे महत्त्वाची भूमिका पार पाडेल आणि रोजगाराबरोबरच मानव संसाधनाची निर्मिती करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार संभाजीराजे छत्रपती हे होते. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले हेदेखील उपस्थित होते.