मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल करणाऱ्या वकीलाला मारहाण

0

मुंबई : मराठा आरक्षणाला विरोध करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करणारे वकील गुणरत्न सदावर्ते आणि अ‍ॅड. जयश्री पाटील यांच्यावर न्यायालयाबाहेरच हल्ला करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. सदावर्ते यांच्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली असून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.

मराठा आरक्षणावर आज मुंबई उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश नरेश पाटील आणि मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होती. ही सुनावणी झाल्यानंतर गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटील कोर्टाबाहेर पडले. यावेळी कोर्टाबाहेर प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना ‘एक मराठा, लाख मराठा’ अशा घोषणा देत वैद्यनाथ पाटील याने सदावर्ते आणि पाटील यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे इतर वकिलांनी धाव घेऊन वैद्यनाथला अडवून पोलिसांच्या ताब्यात दिले. वैद्यनाथ पाटील हा जालन्याचा असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, या घटनेची कोर्टाने गंभीर दखल घेतली असून सदावर्ते आणि अ‍ॅड. पाटील यांच्या कुटुंबीयांना तात्काळ संरक्षण देण्याचे आदेश दिले आहेत. त्यावर दोन्ही वकिलांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना पोलीस संरक्षण देण्यात येणार असल्याचं राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी न्यायालयात स्पष्ट केलं.

दरम्यान, मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल केल्यामुळे आपल्याला रोज धमक्यांचे हजारो फोन येत असल्याचं सदावर्ते यांनी कोर्टाला सुनावणीवेळी सांगितलं होतं. याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. तर सदावर्ते सतत मीडियाशी बोलत असतात, असं आरक्षणाची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं. त्यावर प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा हक्क असल्याचं सांगत कोर्टाने आरक्षणाची बाजू मांडणाऱ्या वकिलाचं म्हणणं फेटाळून लावलं होत.