औरंगाबाद-मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी औरंगाबादमध्ये मुकुंदवाडी परिसरात रेल्वेखाली उडी मारून प्रमोद होरे-पाटील या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. दरम्यान प्रमोद होरे-पाटील याच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांची मदत आणि पात्रतेनुसार कुटुंबातील एका सदस्याला नोकरी दिली जाईल असं लेखी आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.
प्रमोद पाटीलच्या आत्महत्येनंतर मुकुंदवाडीतील, रास्ता रोको, बाजारपेठ बंद करण्यात आली आहे. औरंगाबाद- जालना मार्ग बंद झाला आहे. या भागातील वातावरण तणावपूर्ण असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
प्रमोद पाटील हा स्पर्धा परीक्षांची तयारी करत होता. मात्र आरक्षण नसल्याने तयारी करून देखील समाज बांधवांना संधी मिळत नाही यामुळे तो नाराज झाला होता. अखेर समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आपला जीव देत असल्याचे त्याने फेसबुकवर फोटो पोस्टमधून जाहीर केले होते.