पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त : आंदोलक प्रशासनाला देणार निवेदन
भुसावळ- सकल मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी तालुक्यातील दीपनगरसह निंभोरा, फेकरी येथे सोमवारी बंदचे आवाहन करण्यात आल्यानंतर व्यावसायीकांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवल्याने येथे बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आहे. या बंदमधून शाळा-महाविद्यालयासह बँकांना वगळण्यात आले आहे. सकल मराठा समाजाचे पदाधिकारी प्रवीण रामदास पाटील, सागर लांजूरकर, राजू साबळे, दिनेश पाटील, सुनील अंभोरे, कैलास लांजूरकर आदींनी बंदचे आवाहन केले आहे. दरम्यान, या परीसरात खबरदारीचा उपाय म्हणून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अपर पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्यासह तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण हजारे, उपनिरीक्षक सचिन खामगड परीस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. राज्य राखीव दलाची तुकडीसह 50 पोलिसांचा बंदोबस्त येथे राखण्यात आला आहे.