औरंगाबाद-मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सध्या संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन सुरु आहे. मराठा समाजातील तरुण आत्महत्या करीत आहे. आत्महत्येचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. दरम्यान आता पुन्हा एका मराठा समाजातील तरुणाने आत्महत्या केली आहे. उच्च शिक्षित असतानाही नोकरी मिळत नसल्याने निराश झालेल्या एका मराठा तरुणाने आत्महत्या केली आहे. उमेश इंडाईत (वय २१) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
आत्महत्येपूर्वी त्याने लिहीलेल्या सुसाईड नोटमध्ये त्याने ही बाब सांगितली आहे. मराठा आरक्षणासाठी सध्या राज्यभरात आंदोलने होत असल्याच्या पार्श्वभूमीवर झालेली ही सहावी आत्महत्या आहे. उमेशने आपल्या सुसाईडनोटमध्ये आई-वडिलांची माफी मागितली आहे. तसेच आपण मराठा असतानाही नोकरी मिळत नसल्याचेही त्याने चिठ्ठीत लिहीले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील चिखलठाणा येथे ही घटना घडली.
औरंगाबाद येथील कोयगाव येथील रहिवासी असलेल्या काकासाहेब शिंदे या तरुणाने नदी उडी घेऊन सर्वप्रथम आत्महत्या केली होती. त्यानंतर मराठा तरुणांच्या आत्महत्यांचे प्रकार राज्यात घडतच आहेत. कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सकल मराठा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी मराठा तरुणांनी आत्महत्यांचा मार्ग अवलंबू नये असे आवाहन केले आहे. मराठा आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतर विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून याबाबत कायदा करण्यात येईल, असे आश्वासन राज्य शासनाकडून देण्यात आले आहे.
दरम्यान, त्वरीत आरक्षण लागू करावे या मागणीसाठी अडून बसलेल्या मराठा आंदोलकांकडून अनेक ठिकाणी हिंसक आंदोलने केली आहेत. यामध्ये सार्वजनिक तसेच खासगी संपत्तीचे मोठे नुकसान झाले आहे.