मराठा आरक्षण, कोपर्डीतील गुन्ह्याच्या उद्वेगात आत्महत्या!

0

शिरपूर । तालुक्यातील हिसाळे येथील एका 22 वर्षीय युवकाने सावळदे गावालगत तापी पुलावरून उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. 4 तासांनंतर त्याचा मृतदेह शोधण्यात स्थानिक मासेमारांना यश आले. आत्महत्येपुर्वी आई, कुटुंबिय व मित्रांना उद्देशून त्याने लिहिलेल्या चिठ्ठीत कोपर्डीत घडलेल्या अत्याचार-हत्याकांडाच्या गुन्ह्यातील दोषींना अद्यापही शिक्षा झालेली नाही, मराठा आरक्षण अद्यापही मिळालेले नाही म्हणून उद्वीग्न होऊन हा टोकाचा निर्णय घेत असल्याचे नमूद करुन सर्वाची क्षमाही मागितलेली आहे!

मासेमारांनी मृतदेह शोधला
हिसाळे येथील अमोल नारायण शिंदे (22) या युवकाने तापी पुलावरून उडी घेतली. पुलावर सापडलेला त्याचा मोबाईल, चप्पल,पाकीट व मोटारसायकल वरून त्याने पाण्यात उडी घेतल्याचा संशय आल्याने शोधाशोध सुरू झाली होती. मासेमारी करणारे नारायण कोळी, श्रीराम कोळी, उत्तम सोनवणे, कैलास कोळी, हिंम्मत कोळी यांनी मृतदेह शोधला. अमोल हा मुळचा धुळे तालुक्यातील धनुर येथील असून त्याच्या वडीलांचे तो लहान असतांनाच निधन झाल्यानंतर गरीबीमुळे त्याच्यासह आईचाही सांभाळ हिसाळे येथील मामा जिजाबराव पाटील करीत होते. तो चोपडा येथे एमएसडब्ल्युचे शिक्षण घेत होता. घटनास्थळी तहसिलदार महेश शेलार, पोलिस उपनिरीक्षक जे.जे.महाले यांनी भेट दिली.