मराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा-विखे पाटील

0

मुंबई-मुख्‍यमंत्र्यांनी आषाढी एकादशीच्‍या पार्श्वभूमीवर चिथावणीखोर विधाने करून मराठा समाजाच्‍या असंतोषात भर घातली, मराठा समाजाच्‍या आंदोलनाला हिंसक वळण लागण्‍यास राज्य सरकारचे वेळकाढू धोरण तसेच मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चिथावणीखोर वक्‍तव्‍ये कारणीभूत आहे, असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केला असून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

आरक्षणाच्या मागणीसाठी राज्‍यभरात सुरू असलेल्‍या मराठा समाजाच्‍या आंदोलनाबाबत प्रतिक्रिया देताना त्यांनी ही मागणी केली. मराठा आंदोलन आक्रमक होत असल्यामुळे सरकारने सामोपचाराने आंदोलकांशी चर्चा करून आरक्षणाच्‍या पुढील कार्यवाहीसंदर्भात ठोस आश्‍वासन द्यायला हवे होते. मात्र, त्‍याऐवजी मुख्‍यमंत्र्यांनी आषाढी एकादशीच्‍या पार्श्वभूमीवर चिथावणीखोर विधाने करून मराठा समाजाच्‍या असंतोषात भर घातली. योग्यवेळी मराठा आरक्षणाबाबत निर्णय न घेतल्‍यामुळेच राज्‍यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली आहे. ही नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्‍यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विखे पाटील यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनीही गृहमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळणारे मुख्यमंत्रीच महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्यास जबाबदार आहेत असा आरोप केला आहे.