मराठा-कुणबी एकच; ओबीसीमधूनच आरक्षण द्यावे

0

पुणे जिल्हा मराठा क्रांती मोर्चाची मागणी; सासवड येथून आज ‘संवाद यात्रा’

पुणे : मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिल्यास ते न्यायालयात टिकणार नाही, अशावेळी सरकारने समाजाची दिशाभूल न करता इतर मागास प्रवर्गातून म्हणजे ओबीसीमधून आरक्षण द्यावे. मराठा आणि कुणबी समाज एकच असून या मार्गाने मिळलेले आरक्षणच टिकू शकते, अशी मागणी पुणे जिल्हा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक शांताराम कुंजीर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केली.

यावेळी कुंजीर म्हणाले, मराठा समाजाने आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी 58 मोर्चे काढले. मात्र अजूनही सरकार दिरंगाई करत आहे. आताही हिवाळी अधिवेशन 19 तारखेला सुरू होत असताना आरक्षणाचा प्रश्‍न पुढे ढकलला जात आहे. या संदर्भांत 26 नोव्हेंबरपर्यंत निर्णय घेण्यात यावा. तसेच समाजाला कुठल्याही न्यायलयात वैध ठरणार्‍या पद्धतीप्रमाणे ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 30 नोव्हेंबरपर्यंत थांबा असे सांगत आहेत. आता आमचा त्यांच्या शब्दांवर विश्‍वास राहिला नसून त्यांनी 25 तारखेपर्यंत निर्णय घ्यावा अशी मागणी कुंजीर यांनी केली. ते म्हणाले, मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी शुक्रवारपासून (दि.16) संवाद यात्रेस सासवडमधून सुरुवात होणार आहे.

मुंबईत चक्काजाम करणार

यात्रेदरम्यान पुणे जिल्ह्यात कोपरा सभांचे आयोजन केले जाणार आहे. 26 नोव्हेंबरला संवाद यात्रा विधानभवनावर जाऊन धडकणार आहे. या संपूर्ण संवाद यात्रेत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील संवाद यात्रा सहभागी होणार आहेत. चारचाकी आणि दुचाकी घेऊन ही यात्रा मुंबईत जाऊन धडकणार असून, त्यावेळी चक्काजाम करण्यात येईल, असा इशारा संघटनेकडून देण्यात आला.