मुंबई । मराठा समाजाला आरक्षण मिळावे आणि अन्य विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने मंगळवारी आझाद मैदान ते मंत्रालय अशी हाक देण्यात आली होती. मात्र मराठा समाजाची उपस्थिती अत्यल्प असल्याने हा मोर्चा गुंडाळण्याची वेळ आयोजकांवर आली. त्यामुळे मुंबईत मोर्चा न काढता मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आझाद मैदानातच बेमुदत उपोषण सुरू केले आहे. मराठा समाजात सरकार फूट पाडत असून, आमचेही फितूर झाले आहेत, असा आरोप मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक संभाजी पाटील यांनी जनशक्तिशी बोलताना सांगितले.
मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक संभाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली दुपारी 2 वाजता हा मोर्चा निघणार होता. त्यासाठी आझाद मैदानात मराठा समाजाचे कार्यकर्ते जमले होते. मात्र मोर्चात सहभागी होण्यासाठी आझाद मैदानात अवघे 100 ते 150 लोक जमले होते. राज्यभरात मराठा समाजाचे अभूतपूर्व मोर्चे निघाले असताना, अवघे 100 ते 150 लोकांसह मंत्रालयावर मोर्चा कसा काढायचा, असा पेच आयोजकांसमोर उभा राहिला होता. त्यामुळे मोर्चा रद्द करून, बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला. आझाद मैदान ते मंत्रालय असा मोर्चा काढण्यास कायद्याने बंदी आहे असे काही कार्यकर्ते आपल्या सहकार्यांची समजूत काढताना दिसत होते. तर दुसरीकडे सरकारकडून निर्णय आल्यानंतर मोर्चा काढण्यात येईल, असेही काहीजणांकडून सांगितले जात होते. त्यामुळे उपस्थितांमध्ये संभ्रम पसरला होता. यावेळी आझाद मैदानात अनेकांनी भाषणे केली. एक मराठा लाख मराठा, तुमचे आमचे नाते काय, जय जिजाऊ जय शिवराय, मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. यावेळी आझाद मैदानात संभाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली केदार कदम, सुभाष जाधव, अविनाश पवार, बन्सी डोके, दत्तात्रय सूर्यवंशी, सतीश शिंदे, श्याम आवारे यांच्यासह अनेकजण उपोषणास बसले आहेत. मराठा मोर्चा असल्याने आझाद मैदानात पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता. कोपर्डी प्रकरणाचा निषेध करत औरंगाबादमधून मराठा क्रांती मोर्चाची सुरुवात झाली. त्यानंतर राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मराठा समाजाचे प्रचंड मोर्चे निघाले. मुंबईतील मराठा क्रांती मोर्चाची तारीख नेहमीच बदलत गेली होती. त्यामुळे मुंबईतील मोर्चाकडे सगळ्यांचे लक्ष वेधले होते. काही दिवसांपूर्वीच शिवप्रहार संघटनेचे प्रमुख संजीव भोर यांनी क्रांती दिनाचे औचित्य साधत 9 ऑगस्टला मुंबईत मराठा मोर्चा काढण्यात येईल, अशी माहिती मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत दिली होती. मात्र त्यापूर्वीच मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक संभाजी पाटील यांनी मंगळवारी मोर्चा काढला. त्यामुळे मराठा समाजात फूट पडल्याचे दिसून येत आहे.
ज्या लोकांनी यापूर्वी तारखा घोषित केल्या त्या नेहमीच बदलण्यात आल्या. मग त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा? कमी उपस्थितीचा मुद्दा नाही. आमचे आंदोलन हे निर्णायक आहे. मराठा समाजामध्ये कोणतीच फूट पडलेली नाही. सरकार जाणीवपुर्वक फूट पाडतेय. त्यात आमचेही काही फितूर झाले आहेत. आम्ही मोर्चा रद्द केला नाही. पोलीस आम्हाला बाहेर जाऊ देत नाहीत. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत बेमुदत उपोषण सुरूच राहणार आहे. – संभाजी पाटील, समन्वयक मराठा क्रांती मोर्चा