लोणावळा- मराठा क्रांती मोर्चा मावळ तालुक्याच्यावतीने गुरुवारी मावळ तालुका बंदची हाक दिली आहे. मावळ तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांची बैठक आज कार्ला याठिकाणी पार पडली. यावेळी मराठा आरक्षणाकरिता जलसमाधी घेणार्या काकासाहेब शिंदे यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. पंढरपुरची वारी संपवून वारकरी परतीच्या मार्गावर असल्याने त्यांची गैरसोय ठाळण्याकरिता गुरुवारी बंदची हाक देण्यात आली आहे. यामध्ये लोणावळा शहर, ग्रामीण परिसर, कामशेत, वडगाव, तळेगाव, देहूरोड, पवनानगरसह ग्रामीण भागातील सर्व बाजारपेठा, शाळा, महविद्यालये बंद ठेवण्याचे आव्हान करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता बाकी सर्व व्यावसाय बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
लोणावळा शहरात काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली
संपूर्ण राज्यभरात मराठा क्रांती मोर्चाने बंद पुकारला आहे. पुणे जिल्ह्यातील लोणावळा शहरात मराठा क्रांती मोर्चा कार्यकर्त्यांनी मुख्य शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहिली. सोमवारी औरंगाबाद जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काकासाहेब शिंदे या तरुणाने जलसमाधी घेतली. मराठा आरक्षणासाठी प्राणत्याग करणार्या या तरुण मराठा मुलाला श्रद्धांजली वाहण्यासाठी मंगळवारच्या बंदमध्ये सहभागी नसतानाही मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी चौकात जमून महाराजांच्या पुतळ्याला हार घातल्यावर शांततेत काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहिली.