मराठा क्रांती मोर्चाच्या विरोधातील याचिका मागे घेतली जाणार

0

मुंबई-मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने करण्यात आलेल्या आंदोलनाविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका मागे घेण्यात येणार आहे अशी माहिती याचिकाकर्ते द्वारकानाथ पाटील आणि त्यांचे वकील आशिष गिरी यांनी दिली. आंदोलनादरम्यान सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करणाऱ्या आंदोलकांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी करणारी याचिका ९ ऑगस्टला मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.

मराठा मोर्चाविरोधातली ही याचिका १३ ऑगस्टला मागे घेण्यात येणार आहे. मराठा मोर्चाच्या समन्वयकांनी तोडफोडीच्या घटनांची दखल घेतली आहे. तसेच यापुढे रस्त्यावर उतरून आंदोलन न करण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आमच्या याचिकेचा हेतू साध्य झाला आहे. याच कारणामुळे आम्ही याचिका मागे घेत आहोत असेही गिरी यांनी स्पष्ट केले. ९ ऑगस्टला मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या आंदोलनाला पुणे, औरंगाबाद, लातूर या ठिकाणी हिंसक वळण लागले होते. त्यामुळे ही याचिका दाखल करण्यात आली होती.