बरोबर एक वर्षापूर्वी अहमदनगर जिल्हयातील कोपर्डी गावात अल्पवयीन मुलीसोबत झालेला अत्याचार आणि त्याविरोधात उमटलेली, दीर्घकाळ चाललेली मराठा समाजातील प्रतिक्रिया आणि शांततामय चळवळ म्हणजे मराठा क्रांती मोर्चा 2016 होय. भारताच्या इतिहासात छत्रपती शिवरायांच्यानंतर एकत्रित आलेला हा मराठा समाज शांततेच्या मार्गाने महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारत वर्षात एक इतिहास घडवतो हाही इतिहासच आहे. वस्तुत: ग्रामीण भागात केवळ मात्र लग्न आणि मरणातच मराठा एकवटतो.
राजकारणात हा कायमच एकमेकांच्या विरोधात उभा ठाकलेला असतो. मराठा अस्मिता कोपर्डी घटनेवरुन ठसठसीत उमटलेली मीडिया आणि समाजाने पाहिली. मराठा समाज हा पाटील, देशमुख, चौधरी, महाजन, वतनदार, आसामी,दक्षिणी या आणि अशाच कैक उच्च-निचतेमध्ये विभागलेला आहे. याच पोटजाती वेळप्रसंगी म्यानातून तलवारी बाहेर काढून आपल्याच जाती समुदायाविरुध्द उभ्या ठकतात. अशा अवस्थेत मराठा समाजात सुरु असलेली धग कोपर्डी घटनेतून वर आली वादानंतर विवाद असतो, तसं क्रियेनंतर प्रतिक्रिया उमटते. मराठा क्राती मोर्चाही क्रिया असेल तर इतर समाजानी काढलेले मोर्च ही त्यावरची प्रतिक्रिया म्हणावी लागेल अर्थातच क्रियेएवढी प्रतिक्रिया प्रभावी ठरली नाहीये.
महाराष्ट्रातील बहुसंख्य मराठा शेतीत राबणारा करोडोंचा पोशिंदा असलेला शेतकरी-कामकरी-कष्टकरी आहे. यांचे वारसदार उद्योग, राजकारणात, समाजकारणात, अधिकारी म्हणून सेवारत आहेत. विविध व्यवसायात विभागलेला मराठा सहसा एकत्र येणे कठीण असते. अशा अवस्थेत ग्रामीण भागातील अत्यंत कष्टकरी गरीब आणि हलाखीचे जीवन जगणार्या तरुणाईला सहजासहजी शिकून सवलत मिळत नाही. त्यांना नोकरी-शिक्षणात आरक्षणाची जुनीच मागणी होती. अत्यल्पकाळ काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात मराठा-मुस्लिम अरक्षण लागूही झाले अन् निघालेही! मग हा मराठा समाजात असलेला असंतोष कुठेतरी खदखदत करत होता. कोपर्डी घटनेने या खदखद असलेल्या असंतोषाला मराठा समाजाने वाट मोकळी करुन दिली, असे विधान केले तरी वावगे होणार नाही.
कोपर्डी घटनानिमित्त मात्र ठरली मराठ्यांना एकत्र करायाला! औरंगाबाद आणि रावेर जि.जळगाव येथून प्रारंभ झालेल्या मराठा क्रांती मोर्चात हजारो नंतर लाखोंच्या संख्येने एकत्रित झालेला समाज म्हणजे राज्यात देशात एक आदर्श ठेवून गेला. तरुणाईचा विशेष तरुण-मुलींना ठसठसीत डोक्यात भरणारा नेतृत्व गुण विशेष…दिसून आला. विशेष असे की कृतीशील असलेला मराठा समाज हा मराठा क्रांती मोर्चात अत्यंत संयमी दिसून आला. मराठा क्रांती मूक शांती मोर्चाला कुठेही गालबोट लागले नाही. करोडो लोकांची उपस्थिती संयम, शांतता, अहिंसा या देशाला देणगी देवून गेली. घोषणा नाही की तोडफोड नाही. आतापर्यंतचे दोन-तीन अंकातील मोर्चांनी किती हिंसक वळण घेतलेय हे समाजाने पाहिले आहे.
क्या पाया क्या खोया?
सर्व स्तरातील म्हणजे ग्रामीण भागापासून शहरी भागातील कष्टकरी, अधिकारी, पदाधिकारी मोर्चात सामील झाले पण कोणीही कोणाचे नेतृत्व केले नाही. नेता नसलेला मूक मोर्चा सरकारच्या उरात धडकी भरवणारा होता. मोर्चाचे माध्यमातून मराठा समाज हा शांतताप्रिय आहे हे दाखवून दिले. आम्ही नेतृत्वाविना एकत्र येवून ताकद दाखवू शकतो हेही दिसून आले. मराठा क्रांती मोर्चाचे जसेच्या तसे अनुकरण करत मराठेतर मुस्लीम आणि मागासवर्गीयांचे मोर्चे निघाले. सरकारने ना मराठा क्रांती मोर्चाची मागणी पूर्ण केली ना मराठेतरांची!! मराठ्यांच्या या मूकशांती क्रांती मोर्चातून राज्या
व्यापी समाजमान्य असे हार्दिक पटेल अथवा कन्हैयाकुमार सारखे पक्ष निरपेक्ष सर्वव्यापक, सर्व समावेशक नेतृत्व मिळाले असते तर मोर्चाला एक नवीन झळाळी प्राप्त झाली असती दुर्देवाने तसे दिसले नाही.
प्रदीप गायके
आवृत्तीप्रमुख
दै.पुण्यप्रताप,जळगाव – मो.9881892544