मराठा मोर्चानिमित्त बारामतीत रॅली

0

बारामती । मुंबई येथे येत्या 9 ऑगस्टच्या क्रांतिदिनी मराठा क्रांतीमोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने बारामतीतालुक्यातील पुर्व तयारी म्हणून बारामती शहरात मराठा बाईक रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीचे आयोजन युवतींनी केले होते. तीन किलोमीटरच्या या रॅलीमध्ये जवळपास एक हजाराहून अधिक दुचाकीस्वार सहभागी झाले होते.

सकाळी साडेआकराच्या दरम्यान बारामती शहरातील रेल्वे मैदानावर सर्वजण एकत्र जमले. याठिकाणी मुंबईतील मोर्चाविषयी सुचना देण्यात आल्या. मोर्चात शांततेने सहभागी होण्याची व शांतता राखण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे असेही सांगण्यात आले. यानंतर या रेल्वे मैदानावरून रॅलीची सुरूवात झाली.

रेल्वे मैदान भिगवण चौक, इंदापूर चौक या मार्गावरून ही रॅली कसबा येथे पोहोचली. त्यानंतर श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयास युवतींच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर रॅली गुणवडी चौक, गांधी चौक, भिगवण चौक, पेन्सिल चौक या ठिकाणावरून परत रेल्वे मैदानावर पोहोचल्यानंतर रॅलीचा समारोप झाला. दि. 8 ऑगस्ट रोजी बारामतीहून कार्यकर्ते खासगी वाहनांनी व रेल्वेने मुंबईला रवाना होणार आहेत. मुंबईमध्ये बारामती तालुक्यातील मराठा समाज बांधवांची राहण्याची व्यवस्था एकाच ठिकाणी केली जाणार असल्याचे सांगितले. मोर्चाचे नियोजन यशस्वी होण्यासाठी आपण सवार्ंनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले.