नवी मुंबई :- मुंबईतून निघणाऱ्या मराठा मोर्चा साठी माथाडी कामगारांनीही जय्यत तयारी केली असून त्यांचा आढावा घेण्यासाठी बुधवारी माथाडी भवन येथे माथाडी नेते नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली सभा घेण्यात आली.या सभेत माथाडी बोर्डाच्या टोळ्यांचे मुकादम,उपमुकादम व कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी ३० लाख रुपये निधी देण्यात येणार असल्याची घोषणा नरेंद्र पाटील यांनी सभेत केली.
९ ऑगस्ट रोजी मुंबईतून निघणाऱ्या मराठा मोर्च्या समर्थनार्थ नरेंद्र पाटील यांनी बुधवारी सभा आयोजित केली होती.त्यावेळी त्यांनी पुढे बोलतांना सांगितले की माथाडी कामगारचळवळ,स्व.आमदार अण्णासाहेब पाटील यांचे कार्य पुढे नेणे हे माझे ध्येय आहे,राजकीय कारकिर्दीला बगल द्यावी लागली तरी बेहत्तर,पण माथाडी कामगार व मराठा समाजावर अन्याय होऊ देणार नाही,अशी कळकळीची ग्वाही पाटील यांनी सभेत दिली.त्याचवेळी राज्यात शेतकरी,कामगार व पिडीत घटकाला आर्थिक सहाय्य करणाऱ्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीला तमाम माथाडी कामगारांनी माथाडी बोर्डामार्फत मिळणारी भरपगारी रजेची अंदाजे ३० लाख रुपये रक्कम देण्याचा निर्णय यावेळी सभेत घेण्यात आला.