औंध मिलिटरी कॅम्पमध्ये विशेष परेड
पुणे : भारतीय लष्कराच्या ‘मराठा लाईट इन्फंट्री’ला (जंगी पलटण) 250 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त 30 व 31 जानेवारीला लष्कराच्यावतीने विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे. यानिमित्त बुधवारी लष्कराच्या औंध मिलिटरी स्टेशनमध्ये झालेल्या एका विशेष कार्यक्रमामध्ये लेफ्टनंट जनरल अशोक आम्रे यांनी बटालियनच्या परेडचे परीक्षण केले. त्याप्रमाणेच बटालियनच्या शहीद जवानांच्या कुटुंबीयांनाही यावेळी गौरवण्यात आले.
मराठा लाईट इन्फंट्रीची 4 ऑगस्ट 1768मध्ये बॉम्बे सिपॉय नावाने बटालियनची स्थापना करण्यात आली होती. ही बटालियन भारतीय सैन्यातील तिसरी सर्वात जुनी बटालियन आहे. बटालियनने गाजवलेल्या शौर्यामुळे बटालियनला जंगी पलटण या किताबाने गौरवण्यात आले होते. बटालियनला गेल्या 250 वर्षांमध्ये 15 वेळा युद्धातील कामगिरीसाठी गौरवण्यात आले आहे. याप्रमाणेच लष्कर प्रमुखांच्या गौरव पदकासह सात वेळा विविध प्रकारच्या कामगिरीसाठी बटालियनला गौरवण्यात आले आहे. 250 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त औंध मिलिटरी कॅम्प येथे बुधवारी (दि.30) विशेष परेडचे आयोजन करण्यात आले होते. या परेडला लेफ्टनंट जनरल अशोक आम्रे यांनी संबोधित केले. यावेळी 1965, 1971, 1972 या लढायांमध्ये आणि 2001ला कारगिल युद्धात वीर मरण आलेल्या कुटुंबियांचा त्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.