मुंबई : मराठा समाजाला एसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात आले आहे. हे आरक्षण न्यायलयात देखील टिकले आहे. दरम्यान आता वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. यंदाच्या वर्षीपासूनच वैद्यकीय प्रवेशांमध्ये मराठा आरक्षण लागू होणार आहे. वैद्यकीय प्रवेशासाठी यंदाच्या वर्षी एसईबीसीअंतर्गत आरक्षण लागू करण्याला विरोध करणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. प्रवेश प्रक्रिया जरी आधी सुरु झाली असली तरी आरक्षण हे प्रवेश देतानाच लागू होते, त्यामुळे याचिकाकर्त्यांचा दावा वैध नसल्याचा राज्य सरकारचा दावा उच्च न्यायालयाने स्वीकारला आहे.
यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून एमबीबीएसच्या प्रवेश प्रक्रियेसाठी मराठा आरक्षण लागू करू नये. २०१९-२० या शैक्षणिक वर्षापासूनच मराठा आरक्षण लागू करावे, यासाठी राज्य सरकारने एसईबीसी कायद्यात केलेली सुधारणा अवैध ठरवावी, अशी मागणी करणारी याचिका एमबीबीएसला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती. एमबीबीएसची प्रवेश प्रक्रिया १ नोव्हेंबर, २०१८ पासून सुरू झाली. त्यानंतर, राज्य सरकारने एसईबीसी कायदा मंजूर केला. एमबीबीएसच्या यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून एसईबीसी कायद्यानुसार प्रवेश दिला जाणार नाही, असे आश्वासन राज्य सरकारने दिले, परंतु मार्च महिन्यात राज्य सरकारने एमबीबीएस व वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी एसईबीसी कायद्यानुसार मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देणे बंधनकारक केले.
या निर्णयाला वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठापुढे आव्हान दिले. त्यावर नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला दणका देत, यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेसाठी हा कायदा लागू होत नाही, असे स्पष्ट केले. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. मात्र, सर्वोच्च न्यायालयानेही राज्य सरकारला दिलासा देण्यास नकार दिला. उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून, राज्य सरकारने विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात एसईबीसी कायद्याच्या १६ (२) तरतुदीत सुधारणा करून, २०१९ -२० या शैक्षणिक वर्षापासूनच एमबीबीएस व वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेत १६ टक्के मराठा आरक्षण देण्याची तरतूद केली, असे याचिकेत म्हटले होते.