मराठा समाजाची नागपुरात धडक

0

नागपूर : कोपर्डीच्या घटनेला केंद्रस्थानी ठेवून सुरू झालेल्या मराठा क्रांती मूकमोर्चाने बुधवारी हिवाळी अधिवेशनावर धडक दिली. प्रथमच विधान भवनात जाऊन सरकारशी थेट चर्चा करून अधिवेशन संपण्यापूर्वी आमच्या मागण्या पूर्ण करा, अन्यथा आगामी काळात समाज बुलेटऐवजी बॅलेटने उत्तर देईल, असा सज्जड दम विधान भवनात धडकलेल्या मराठा रणरागिणींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला. प्रथेप्रमाणे आजही मराठा क्रांती मोर्चा समितीतील मुलींच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे साद घालून आम्ही पहिल्यांदाच सरकार नावाच्या यंत्रणेला भेटत आहोत, त्यामुळे खाली हात जाऊ देऊ नका, अशी मागणी केली. मात्र सरकार तुमच्या सोबत असल्याचे पालुपद सुनावत मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोणतीही ठोस भूमिका घेतली नसल्यामुळे मराठा समाज मुंबईवर चढाई करण्याच्या तयारीत आहे.

संत्रानगरी भगवामय
मोर्चा निघण्यापूर्वी यशवंत स्टेडियममध्ये जमलेल्या हजारो मराठा बांधवांनी माँ जिजाऊ यांना वंदना केल्यानंतर या मोर्चाला सुरुवात झाली. कोणतीही घोषणाबाजी न करता अगदी शांततेने आपल्या मागण्यांचे हातात फलक घेऊन हा मोर्चा शिस्तबद्ध पद्धतीने निघाला. या मोर्चाचे नेतृत्व युवतींकडे देण्यात आले होते. दुपारी सव्वादोनच्या सुमारास विधानभवनाजवळ असलेल्या मॉरिस टी पॉईंटवर मोर्चा थांबला. तेथे युवतींनी आपल्या मागण्या आपल्या भाषणातून मांडल्या. या मोर्चामध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. महिलांनी काळ्या साड्या परिधान करून मोर्चात सहभागी झाल्या होत्या. लहान विद्यार्थी, वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी, वकील, डॉक्टर तसेच गरीब शेतकरी यांच्यासह शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, काँगे्रससह सर्वपक्षीय आमदारांनी या आंदोलनात सहभाग घेतला.

सर्वपक्षीय नेत्यांचा सहभाग
यशवंत स्टेडियमवरून दुपारी 12 वाजता या मोर्चाला सुरुवात झाल्यावर मुलींचा सहभाग असलेल्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन दिले. यावर मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला रिकाम्या हाती पाठवणार नाही, असे आश्वासन दिले आहे. याशिवाय आज मराठा समाजाच्या तरुणींच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना मराठा आरक्षणाचा निर्णय तातडीने घ्या, नेहमीची कारणे सांगून आमच्या तोंडाला पाने पुसू नका, असे सुनावले. बाराच्या सुमारास नागपुरातील यशवंत स्टेडिअमवरुन मोर्चाला सुरुवात झाल्यावर दुपारी एक नंतर 25 लाखांवर लोक गोळा झाल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आपला सहभाग मोर्चात दाखविला. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, धनंजय मुंडे, खा. संभाजीराजे, भाई जगताप, आ. आशिष शेलार, आ. आशिष देशमुख, नारायण राणे, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह दीडशेवर आमदार भगवे फेटे घालून मोर्चात हजर होते. त्यानंतर दुपारी सव्वादोनच्या सुमारास मॉरिस टी पॉईंटवर राष्ट्रगीताने मोर्चाची सांगता झाली. मराठा मोर्चातील मुलींच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन आपल्या मागण्या मांडल्या.

मुंबईत चर्चा करणार
विधानभवनावर धडकलेल्या मराठा-कुणबी क्रांती मोर्चाला राज्य सरकारच्यावतीने महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे सामोरे गेले. या दोघांनी निवेदन स्वीकारुन मोर्चेकरांची मुख्यमंत्र्यांसोबत भेट घडवून आणली. या भेटीत झालेल्या चर्चेची माहिती चंद्रकांत पाटील यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात दिली. मराठा आंदोलनाचे प्रतिनिधी म्हणून पाच तरुणी आणि प्रमुख नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. आंदोलनकर्त्यांनी मांडलेल्या मागण्यांवर राज्य सरकारने कोणती पावले उचलली आहेत त्याची सविस्तर माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर मुंबईत वेळ देऊन चर्चा केली जाईल. मराठा आरक्षणाची चर्चा पदाधिकार्‍यांपुरती मर्यादित न ठेवता आरक्षणाचे अभ्यासक, तज्ज्ञ यांना सोबत घेऊन एक गट तयार करण्यात यावा. या गटासोबत मुख्यमंत्री चर्चा करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. राज्य सरकारने घेतलेल्या या भूमिकेचे विधानसभेत स्वागत करण्यात आले.