पिंपरी-चिंचवड : सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मरठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी बुधवारी खासदार, आमदारांच्या घरांसह जनसंपर्क कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. सकाळी 9 वाजता निगडीतील भेळ चौकात भाजपचे राज्यसभा खासदार अमर साबळे यांच्या कार्यालयासमोर, 10 वाजता थेरगावला शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांना घरासमोर, 11 वाजता मोरवाडीतील भाजपच्या जनसंपर्क कार्यालयासमोर शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे आणि त्यानंतर पिंपरीतील शिवसेना आमदार गौतम चाबुकस्वार यांच्या कार्यालयासमोर आंदोलन झाले. मराठा आरक्षणाबाबत पिंपरी चिंचवडच्या खासदार, आमदारांनी केंद्र व राज्यात आवाज उठवून मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा. अशी मागणी आंदोलकांच्या वतीने करण्यात आली. या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.