महामार्ग ठप्प : आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी
यावल- शासनाने मराठा समाजास आरक्षण द्यावे तसेच आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावे या मागणीसाठी किनगावसह परीसरातील सकल मराठा समाजाच्या वतीने शुक्रवारी बर्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावरील चौफुली रस्त्यावर सकाळी दहा वाजता ठिय्या आंदोलन केले. आंदोलनामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती.
आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी
आंदोलनप्रसंगी ‘एक मराठा, लाख मराठा’, ‘जय जिजाऊ, जय शिवाजी’च्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी रस्ता रोकोही करण्यात आला. मराठा समाजास आरक्षण मिळावे यासाठी राज्यभरात मागील वर्षी 58 मोर्चे शांततेत काढण्यात आले तर गेल्या 15 दिवसांपासून राज्यभरात समाजबांधव ठिकठिकाणी आंदोलन करीत आहे. 15 दिवसात अनेक मराठा तरुणांनी आत्महत्या केल्या असल्यातरी शासन त्याकडे डोळेझाक करीत असल्याने समाजाच्या भावना तीव्र झाल्या आहेत. राज्यभरात आंदोलकावर दाखल केलेले गुन्हे त्वरीत मागे ह्यावे व मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशा आशयाच्या मागणीचे निवेदन यावल पोलीस निरीक्षक डी.के.परदेशी यांना देण्यात आले.
यांचा आंदोलनात सहभाग
जिल्हा परीषदेचे माजी सदस्य आर.जी.पाटील, पंचायत समिती उपसभापती उमाकांत पाटील, माजी आमदार रमेश चौधरी, अनिल साठे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संजीव सोनवणे यांच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन करण्यात आले. नायगाव सरपंच एल.व्ही.पाटील, देवकांत पाटील, यावलचे सुनील गावंडे, शशीकांत पाटील, भागवत पाटील, ज्ञानेश्वर पाटील, योगेश पाटील, भरत सोनवणे, दगडू पाटील, संभाजी पाटील, नायगाव खुर्द सरपंच भूषण पाटील, टिकाराम चौधरी, परमानंद साठे, पंचायत समितीचे माजी सदस्य प्रशांत पाटील आदींसह समाजबांधव आंदोलनात सहभागी झाले.