रावेर कडकडीत बंद : निंभोरासीम नदीपात्रात आंदोलनाचा इशारा
रावेर- मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आल्यानंतर रावेर शहरातील व्यापार्यांनी मंगळवारी स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाळला. मंगळवारी सकाळी मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते संभाजी ब्रिगेडचे योगराज महाजन, राष्ट्रवादी किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष सुरेश पाटील, पंचायत समिती सदस्य दीपक पाटील, राष्ट्रवादीचे युवा अध्यक्ष राजेंद्र चौधरी, किशोर पाटील संभाजी बिग्रेट तालुकाध्यक्ष घनशाम पाटील, शेतकी संघ मॅनेजर विनोद चौधरी, मराठा सेवा संघाचे प्रशांत पाटील, सचिन पाटील, अॅड.लक्ष्मण शिंदे यांच्यासह असंख्य मराठा समाजबांधवांनी शहर बंद करण्याचे आवाहन केल्यानंतर व्यापार्यांनी त्यास प्रतिसाद दिला. शहरातील डॉ.आंबेडकर चौक, छोरीया मार्केट, एम.जे.मार्केट, बसस्थानक परीसर, मेन रोड, बर्हाणपूर रोड शहरातील आदी मुख्य रस्त्यावर घोषणाबाजी करीत मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली तसेच छत्रपती शिवरायांचा जयजयकार करण्यात आला. पोलिस प्रशासनातर्फे पोलिस निरीक्षक नरेंद्र पिंगळे यांनी शहरात कडेकोट बंदोबस्त राखला.
जलसमाधी, ठिय्या आंदोलनाचा निर्धार
मराठा समाजातर्फे आंदोलनाची पुढची दिशा ठरविण्यासाठी मंगळवारी महत्वाची बैठक येथील मराठा मंगल कार्यलयात पार पडली. यावेळी अनेकांनी आपली मनोगते व्यक्त केली. सुरुवातीला स्व.काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. गुरुवारी निंभोरासीम येथील तापी नदीपात्रात जलसमाधी आंदोलन तर शुक्रवारी डॉ.आंबेडकर चौकात ठिय्या आंदोलन करण्याचा निर्धार मंगळवारच्या बैठकीत करण्यात आला. माजी आमदार अरुण पाटील, डॉ.एस.आर.पाटील, राष्ट्रवादी ओबीसी तालुकाध्यक्ष सुनील कोंडे, जिल्हा सदस्य रमेश पाटील, एस.व्ही.चौधरी, राजेंद्र चौधरी, राजू ठेकेदार, ललित पाटील, तेजस पाटील, सरपंच सुनील महाजन, सीताराम महाजन, पांडुरंग चौधरी, सुनील महाजन, विलास ताठे आदी समाज बांधव उपस्थित होते.