मराठा समाज आरक्षण : निंभोरासीमच्या तापी पुलाला छावणीचे स्वरूप

0

काही वेळात आंदोलनाला होणार सुरुवात : आंदोलनावर पोलिसांची करडी नजर

रावेर (शालिक महाजन)- मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी सकल मराठा समाजातर्फे महाराष्ट्रभर आंदोलन सुरू आहेत तर रावेर तालुक्यातील निंभोरासीमच्या तापी पात्रात जलसमाधी आंदोलन गुरुवारी छेडण्याचा इशारा देण्यात आल्यानंतर पोलीस व प्रशासन अलर्ट झाले आहे. अवघ्या काही वेळात आंदोलनाला सुरुवात होत असून आंदोलक नदीपात्रावर येण्यास सुरुवात झाली आहे. आंदोलनादरम्यान कुठलीही अप्रिय घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त राखला असून तापी पुलाला छावणीचे स्वरूप आले आहे.

दुर्दैवी घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी खबरदारी
कायगाव, ता.गंगापूर येथील नदीपात्रात काकासाहेब शिंदे या तरुणाने जलसमाधी घेतल्यानंतर महाराष्ट्रभर आंदोलन पेटले. त्या पार्श्‍वभूमीवर निंभोरासीम येथे कुठलीही दुर्घटना घडू नये यासाठी डीवायएसपी राजेंद्र रायसिंग, रावेर पोलीस निरीक्षक नरेंद्र पिंगळे, निंभोरा एपीआय प्रकाश वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली पाच उपनिरीक्षक, दोन आरसीपी प्लाटून व 119 पोलीस कर्मचार्‍यांचा तगडो बंदोबस्त राखण्यात आला आहे रावेर तहसीलदार विजयकुमार ढगे, मुक्ताईनगर तहसीलदार मनोज देशमुख, मंडळाधिकारी तसेच नदीपात्रात आपत्ती व्यवस्थापन प्रमुख नरवीरसिंग रावळ यांच्यासह त्यांची टीम नावेतून गस्त घालत आहे शिवाय रावेर तहसीलदारांनी तीन स्वतंत्र खाजगी बोट नेमल्या असून सुमारे 30 पट्टीच्या पोहणार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे. एक रुग्णवाहिकासह एका तज्ज्ञ डॉक्टर सेवेसाठी हजर असून तापीच्या पात्राखाली देखील पोलिसांची गस्त सुरू करण्यात आली आहे.