शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केला खुलासा; फोनवरुन संवाद साधला असल्याचा दावा
मुंबई : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देता येणार नाही, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितल्याचा दावा शिवसेनेच्या नेत्यांनी केला होता. मात्र गृहमंत्र्यांनी अशा प्रकारचे कुठलेही वक्तव्य केले नसल्याचा दावा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मंत्रालयात केला. तावडे यांच्या या दाव्यानंतर शिवसेनेचे खासदार सांस्कृतिक विभागाचा विषय घेऊन गृहमंत्र्यांना का भेटले? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा त्यांनी गुरुवारी केली. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, या संबंधित वृत्त आल्यानंतर मी स्वत: गृहमंत्री सिंह यांच्याशी फोनवर बोललो. त्यावेळी त्यांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळासोबत असे काहीही बोलणे झाले नाही. हा विषय सांस्कृतिक विभागाचा आहे, गृह विभागाचा नाही असे त्यांनी सांगितले असल्याचे तावडे म्हणाले.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला, तर अन्य 30 भाषांनाही तो द्यावा लागेल. त्यामुळे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देता येणार नाही, असे राजनाथ सिंह यांनी सांगितल्याचे शिवसेना नेत्यांनी म्हटले होते. अधिवेशनाच्या काळात आम्ही राजनाथ सिंहांची भेट घेण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी त्यांनी असमर्थता दर्शवली असल्याचे शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी सांगितले होते. याबाबत तावडे यांना विचारले असता त्यांनी ह्या वृत्ताला नकार देत गृहमंत्री सिंह यांनी अशा प्रकारे कुठलेही वक्तव्य केले नसल्याचे सांगितले. सोबतच मुख्यमंत्र्यांनी नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मराठी भाषेला अभिजात भाषेजा दर्जा मिळवून देण्यासंदर्भात आपण स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी व्यक्तीशः पाठपुरावा करणार आहोत, अशी ग्वाही दिली असल्याचे सांगितले.