जळगाव । मराठी ही आपली मायबोली आहे. या भाषेतून घेतलेले शिक्षण आपल्याला ज्ञानसंपन्न करते असे मत केसीई सोसायटीचे प्रशासकीय संचालक डॉ. डी.जी. हुंडीवाले यांनी व्यक्त केले. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मूळजी जेठा महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने ’ आपली बोली : आपली भाषा’ या विषयावरील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा कविता, कथा, गीतगायन, नृत्य नाट्य असा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे उपस्थित असलेले केसीईच्या सांस्कृतिक विभागाचे समन्वयक श्री. शशिकांत वडोदकर यांनी आपल्या मनोगतात कुसुमाग्रजांच्या सहवासातील आठवणी विद्यार्थ्याना सांगितल्या. पाहुण्याच्या हस्ते कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला माल्रार्पण करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
कुसुमाग्रजांनी मराठी साहित्य आणि भाषा यांना दिलेले योगदान महत्त्वपूर्ण आहे. मराठी भाषा गौरव दिन साजरा करतांना आपण आपल्या मातृभाषेच्या संवर्धनासाठी प्रयत्न करण्याचा संकल्प केला पाहिजे असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष मू. जे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय कुलकर्णी यांनी व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. सुरेश तायडे, डॉ. देवयानी बेंडाळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख डॉ. विद्या पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. योगेश महाले यांनी केले. या कार्यक्रमाला डॉ. कल्पना नंदनवार, डॉ. सविता नंदनवार, प्रा. दीनानाथ पाठक, प्रा. चारुता गोखले, प्रा. भाग्यश्री भलवतकर, प्रा. प्रिती शुक्ल, डॉ. ललित तायडे व मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी वेशभूषेत विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कुसुमाग्रजांच्या कवितांचे वाचन
यावेळी ’कितीक हळवे कितीक सुंदर’ ही कुसुमाग्रजांची कविता धनश्री पाटील हिने ’कणा’ कविता विशाल इंगळे याने, ’प्रेम’ हे कविता तेजस्वीनी पाटील हिने कुसुमाग्रजांच्या कवितांचे वाचन केले. लपे करमाची रेखा या बहिनाबाईंच्या कवितेचे सादारीकरण सोनाली महाजन हिने केले. माय मराठी गळ्यात घाली लोककलेचं लेण या गाण्यावर गायत्री ठाकूर हिने, लल्ल्लाटी भंडार या गाण्यावर पूजा शिंदे व सहकारी यांनी तर मथुरेच्या बाजारी या लावणीवर प्रियांका जोगी हिने नृत्य सादर केले.
नाटीका सादर
यावेळी विकास वाघ, विशाल पवार, पियुष तोडकर, वर्षा उपाध्ये, नेहा पवार यांच्या समुहाने ’ मराठी असे आमुची मायबोली’ या विषयावर मराठीचे महत्त्व सांगणारी नाटिका सादर केली. तसेच संत एकनाथांचे ’ मला दादला नको ग बाई’ हे भारुड विकास वाघ व विशाल पवार यांनी सादर केली. शेवटी शिवम वानखेडे यांनी नृत्य सादर केले. पावरा बोलीतून रत्नाकर कोळी यांनी मराठीचे महत्त्व सांगितले. पंकज वराडे यांनी भारत मत गीत सादर केले. दुरचित्रवाणीवर नृत्यासाठी लोकप्रिय असलेला शिवम वानखेडे याने ’झिंगाट’ या गाण्यावर नृत्य सादर केले.